मुंबई : परदेशी निधीचे पुनरागमन आणि बँकांच्या समभागांमधील तेजीने प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी बुधवारी सलग तिसऱ्या सत्रात वधारले. किरकोळ किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ महागाई दर सहा वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोहोचल्याने रेपोदरात आणखी कपात होण्याची आशा निर्माण झाली.

जागतिक बाजारातील कमकुवत कलाकडे दुर्लक्षून देशांतर्गत आघाडीवर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ३०९.४० अंशांनी वधारून ७७,०४४.२९ या दोन आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर स्थिरावला. कमकुवत सुरुवातीनंतर, सेन्सेक्सने ७७,११०.२३ अंशांची उच्चांकी, तर ७६,५४३.७७ ही सत्रातील नीचांकी पातळीला स्पर्श केला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १०८.६५ अंशांची भर पडली आणि तो २३,४३७.२० पातळीवर बंद झाला.

अर्थव्यवस्थेविषयक सकारात्मक आकडेवारी आणि सामान्य मान्सूनच्या अंदाजामुळे गुंतवणूकदारांमध्ये आगामी काळाबद्दल आशावाद दिसून आला, असे विश्लेषकांनी सांगितले.

जागतिक स्तरावर, अतिरिक्त व्यापार शुल्काच्या दबावामुळे तणाव वाढला आहे. अमेरिका आणि चीनमधील तीव्र होत चाललेले व्यापार युद्ध भारताला नुकसान पोहोचवेल असे नाही तर त्याचा फायदा होईल. परिणामी, बुधवारच्या सत्रात भारतीय भांडवली बाजारात सौम्य सकारात्मक भावना दिसून आली. शिवाय मार्चमध्ये किरकोळ महागाई दर ६ वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोहोचल्याने नजीकच्या काळात आणखी दर कपातीचे संकेत मिळत आहेत, असे निरीक्षण जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

सेन्सेक्समध्ये इंडसइंड बँकेचा समभाग ७.१२ टक्क्यांनी वधारला. त्यापाठोपाठ ॲक्सिस बँक, अदानी पोर्ट्स, एशियन पेंट्स, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, स्टेट बँक आणि आयटीसी यांचे समभाग सर्वाधिक तेजीत होते. तर मारुती, इन्फोसिस, टाटा मोटर्स, लार्सन अँड टुब्रो, एनटीपीसी आणि बजाज फायनान्सच्या समभागात सर्वाधिक घसरण झाली.

सेन्सेक्स ७७,०४४.२९ ३०९.४० ( ०.४०%)

निफ्टी २३,४३७.२० १०८.६५ ( ०.४७%)

तेल ६५.२२ ०.९१

डॉलर ८५.६८ -१२ पैसे