मुंबई : भांडवली बाजाराच्या प्रमुख निर्देशांकांनी २०२४ सालाला घसरणीने निरोप दिला. मंगळवारी सलग दुसऱ्या सत्रात निर्देशांक घसरले. तथापि मावळत्या वर्षात दोन्ही निर्देशांकांनी ८ टक्क्यांचा माफक परतावा गुंतवणूकदारांच्या पदरी दिला, तर त्यांच्या श्रीमंतीत तब्बल ७७.६६ लाख कोटी रुपयांची भर घातली. निर्देशांकांसाठी हे सलग नववे सकारात्मक परताव्याचे वर्ष ठरले.
गेल्या काही महिन्यांपासून डोकेदुखी ठरलेल्या परकीय गुंतवणूकदारांचे निर्गमन हेच मंगळवारच्या बाजाराच्या घसरणीचे कारण ठरले. सेन्सेक्सने १०९.१४ अंश (०.१४ टक्के) नुकसानीसह ७८,१३९.०१ या पातळीवर दिवसाची अखेर केली. सत्रांतर्गत हा निर्देशांक ६८७ अंशांनी गडगडला होता; परंतु सत्राच्या उत्तरार्धात तो बव्हंशी सावरला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक मात्र सपाटीलाच विसावला. सोमवारच्या तुलनेत अवघ्या ०.१० अंश तुटीसह तो २३,६४४.८० या पातळीवर बंद झाला.
व्यापक बाजारात मात्र देशी संस्थांसह गुंतवणूकदारांकडून चांगली खरेदी सुरू राहिली. परिणामी बीएसई स्मॉल कॅप निर्देशांक ०.७१ टक्के, तर मिडकॅप निर्देशांक ०.१३ टक्के दराने वाढला.
निर्देशांकांचा विक्रमी चढ आणि उतार
अवघ्या तीन महिन्यांपूर्वी २७ सप्टेंबरला ८५,९७८.२५ या सार्वकालिक शिखराला गाठणारा सेन्सेक्स, वर्षसांगतेला ७८,१३९.०१ वर विसावला. म्हणजेच वर्षातील उच्चांकापासून तो ७,८३९.२४ अंशांनी अर्थात ९.११ टक्क्यांनी शेवटच्या तीन महिन्यांत गडगडला. तरी वर्षारंभाच्या पातळीपासून सेन्सेक्सने ५,८९८.७५ अंशांची अर्थात ८.१६ टक्क्यांची कमाई केली आहे. त्याच वेळी २६,२७७.३५ या विक्रमी उच्चांकाला गवसणी घालून निफ्टी निर्देशांक २०२४ च्या मावळतीला २,६३२.५५ अंशांनी खाली अर्थात सुमारे १० टक्के नुकसानीसह २३,६४४.८० या पातळीवर बंद झाला. तरी वार्षिक तुलनेत या निर्देशांकानेही १,९१३.४ अंशांची अर्थात ८.८० टक्क्यांचा लाभ गुंतवणूकदारांच्या झोळीत दिला आहे. परिणामी २०२४ मध्ये गुंतवणूकदारांच्या मत्तेत ७७.६६ लाख कोटी रुपयांची भर पडली असून मुंबई शेअर बाजारात सूचिबद्ध कंपन्यांचे एकत्रित बाजार भांडवल इतिहासात प्रथमच ५.१६ ट्रिलियन डॉलरवर पोहोचले आहे.
हेही वाचा : New Rule In 2025 : यूपीआय पेमेंट ते EPFO… एक जानेवारीपासून ‘या’ नियमांत होणार बदल
सलग नववे वर्ष सकारात्मक
सरलेले २०२४ हे वर्ष बाजारासाठी आव्हानात्मक असले तरी गुंतवणूकदारांच्या फायद्याचे ठरले. निर्देशांकांनी जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत सातत्याने चढ राखत, ऐतिहासिक उच्चांकांना गाठले. वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात मात्र नफावसुली बाजारावर प्रभावी ठरली. परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून विक्रीने जोर पकडला असला तरी निर्देशांकांसाठी हे सलग नववे सकारात्मक परताव्याचे वर्ष ठरले.
प्रशांत तपासे, वरिष्ठ उपाध्यक्ष (संशोधन), मेहता इक्विटीज