मुंबई : निर्देशांकात सर्वाधिक योगदान राखणाऱ्या एचडीएफसी बँक, इन्फोसिस आणि अल्ट्राटेक सिमेंटसारख्या निवडक ‘ब्लूचिप’ कंपन्यांच्या समभागांमध्ये मंगळवारी झालेल्या वाढीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टीने सलग सातव्या दिवशी तेजी टिकवून ठेवली आहे.
दिवसअखेर सेन्सेक्स ३२.८१ अंशांनी वधारून ७८,०१७.१९ पातळीवर बंद झाला. दिवसभरात, त्याने ७५७.३१ अंशांची कमाई करत ७८,७४१.६९ या उच्चांकी पातळी गाठली होती. मात्र दुपारच्या सत्रात झालेल्या नफावसुलीमुळे त्यात घसरण झाली. मात्र सेन्सेक्स ७८,००० ची पातळी राखण्यास यशस्वी ठरला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १०.३० अंशांची वाढ झाली आणि तो २३,६६८.६५ पातळीवर बंद झाला.
अलिकडच्या काळात झालेल्या वाढीनंतर, विविध समभागांमध्ये वरच्या स्तरावर मंगळवारच्या सत्रात नफावसुली झाल्याचे दिसून आले. विद्यमान महिन्यात १७ मार्चपासून सेन्सेक्स आणि निफ्टी ५.५ टक्क्यांहून अधिक वधारला आहे. नजीकच्या काळात, अमेरिका-भारत यांच्यातील व्यापार धोरणावर स्पष्टतेची वाट पाहात गुंतवणूकदारांनी सावध भूमिका अवलंबिल्याचेही दिसून आले. अपेक्षित व्याजदर कपात आणि रुपयातील मजबूती यासारखे अनुकूल बाबी बाजार तेजीला आधार देत आहेत, असे जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले.
सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांमध्ये, अल्ट्राटेक सिमेंट, इन्फोसिस, बजाज फिनसर्व्ह, ॲक्सिस बँक, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, एचसीएल टेक आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांचे समभाग सर्वाधिक तेजीत होते. तर झोमॅटो सुमारे ६ टक्क्यांनी घसरला, त्यापाठोपाठ इंडसइंड बँक सुमारे ५ टक्क्यांनी घसरला. अदानी पोर्ट्स, महिंद्र अँड महिंद्र, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि सन फार्मा यांचे समभाग देखील नकारात्मक पातळीवर बंद झाले.
आकडे-
सेन्सेक्स ७८,०१७.१९ ३२.८१ (०.०४%)
निफ्टी २३,६६८.६५ १०.३० (०.०४%)
तेल ७३.३९ ०.५३ डॉलर ८५.७४ १३ पैसे