मुंबई : अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार धोरणासंबंधाने अनिश्चिततेमुळे जागतिक पातळीवर गोंधळाचे वातावरण असल्याने त्याचे प्रतिकूल पडसाद शुक्रवारी स्थानिक भांडवली बाजारावर उमटले आहे. परिणामी आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या अखेरच्या सत्राची सांगता प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स-निफ्टीने घसरणीने केली.

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १९१.५१ अंशांच्या घसरणीसह ७७,४१४.९२ पातळीवर बंद झाला. दिवसभरात त्याने ४२०.८१ अंश नुकसानीसह ७७,१८५.६२ या सत्रातील नीचांकी पातळीला स्पर्श केला होता. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ७२.६० अंशांची घसरण झाली आणि तो २३,५१९.३५ पातळीवर बंद झाला. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये, सेन्सेक्स ३,७६३.५७ अंश म्हणजेच ५.१० टक्क्यांनी वधारला, तर निफ्टीने १,१९२.४५ अंशांची ५.३४ टक्क्यांची कमाई केली आहे.

सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांमध्ये इंडसइंड बँकेचा समभाग ३.५० टक्क्यांहून अधिक घसरला. त्यापाठोपाठ महिंद्र अँड महिंद्र (२ टक्के), एचसीएल टेक, मारुती, इन्फोसिस, झोमॅटो, पॉवर ग्रिड, अदानी पोर्ट्स, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि अल्ट्राटेक सिमेंट यांचे समभाग नकारात्मक पातळीवर बंद झाले. तर कोटक महिंद्र बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर, आयसीआयसीआय बँक, टाटा मोटर्स, नेस्ले आणि भारती एअरटेल यांचे समभाग तेजीसह बंद झाले. मुंबई शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, गुरुवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) ११,१११.२५ कोटी रुपये मूल्याचे समभाग खरेदी केले.

अमेरिकेच्या नवीनतम कर उपाययोजनांचा प्रमुख उत्पादक अर्थव्यवस्थांवर लक्षणीय परिणाम होण्याची शक्यता असल्याने त्याचे पडसाद आशियाई भांडवली बाजारांवर उमटले. याव्यतिरिक्त, जपानच्या किरकोळ महागाईमध्ये वाढ झाल्याने चिंता वाढली आहे. देशांतर्गत आघाडीवर गुंतवणूकदारांनी अमेरिकेच्या व्यापार शुल्काचे संभाव्य परिणाम होऊ शकणाऱ्या वाहन निर्मिती, वाहनपूरक सुट्या भागांच्या उत्पादक कंपन्या, औषध निर्माण आणिसंबंधित इतर क्षेत्रांवर होणाऱ्या परिणामांच्या चिंतेने समभाग विक्रीचा मारा केला, असे जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले.

सेन्सेक्स ७७,४१४.९२ -१९१.५१ -०.२५%

निफ्टी २३,५१९.३५ -७२.६० -०.३१%

तेल ७४.१६ ०.१८%

डॉलर ८५.४९ -२५ पैसे