मुंबई: भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी गुरुवारी सलग तिसऱ्या सत्रात घसरले. निर्देशांकांतील सर्वाधिक वजनदार एचडीएफसी बँकेच्या समभागात गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावल्याने पडझड वाढली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ३१३.९० अंशांनी घसरून ७१,१८६.८६ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात त्याने ८३५.२६ अंश गमावत ७०,६६५.५० ही सत्रातील नीचांकी पातळी गाठली होती. मात्र अखेरच्या तासात असलेल्या खरेदीच्या जोरामुळे बाजार सावरला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १०९.७० अंशांची घसरण झाली आणि तो २१,४६२.२५ पातळीवर बंद झाला. दिवसभरात त्यात २८६.४ अंश पडझड होत त्याने २१,२८५.५५ दिवसभरातील तळ गाठला होता.
हेही वाचा >>> बाजारात गुंवतवणुकीची संधी; सवलतीत मिळेल ‘हा’ शेअर, ‘एनएचपीसी’ची प्रत्येकी ६६ रुपयांनी समभाग विक्री
प्रमुख निर्देशांकांनी दिवसाच्या नीचांकीवरून पुन्हा सावरत सकाळच्या सत्रातील नुकसान भरून काढले. मात्र जागतिक पातळीवरील कमकुवत संकेतांमध्ये बाजार नकारात्मक पातळीवर बंद झाला. अमेरिकी मध्यवर्ती बँक – ‘फेड’कडून व्याजदर कपात विलंबाच्या शक्यतेने, तेथील रोख्यांवरील परतावाही वाढला आहे. ज्याच्या परिणामी परकीय गुंतवणूकदार संस्थांकडून स्थानिक बाजारातून गुंतवणूक काढून घेतली जात आहे. दुसरीकडे देशांतर्गत पातळीवर समभागांचे वाढलेले मूल्यांकन आणि नफावसुलीमुळे व्यापक बाजारपेठेमध्ये विक्रीचा दबाव कायम आहे, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले. ‘सेन्सेक्स’मध्ये एचडीएफसी बँक, एनटीपीसी, एशियन पेंट्स, पॉवर ग्रिड, टायटन, इंडसइंड बँक, नेस्ले आणि मारुती या कंपन्यांच्या समभागात सर्वाधिक घसरण झाली. एचडीएफसी बँकेच्या समभागात सलग दोन सत्रात ११ टक्क्यांहून अधिक घसरण झाली. या काळात कंपनीचे बाजार भांडवल १,४५,८८९.५९ कोटींनी कमी होऊन ते ११,२८,३५७ कोटी रुपयांपर्यंत खाली आले. दुसरीकडे सन फार्मा, टेक महिंद्र, टाटा मोटर्स, महिंद्र अँड महिंद्र, ॲक्सिस बँक आणि लार्सन अँड टुब्रो हे समभाग तेजीत होते.