मुंबई : गेल्या दोन सत्रातील घसरणीला लगाम लावत, गुरुवारी प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीने एक टक्क्यांपर्यंत उसळी घेतली. गृहनिर्माण, ऊर्जा आणि वित्त क्षेत्रातील कंपन्यांमध्ये नव्याने झालेल्या खरेदीच्या जोरावर सेन्सेक्सने ४९१ अंशांची मुसंडी घेतली.
गुरुवारी सत्रअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ४९०.९७ अंशांनी वधारून ७१,८४७.५७ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात त्याने ५९८.१९ अंशांची झेप घेत ७१,९५४.७९ ही सत्रातील उच्चांकी पातळी गाठली होती. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १४१.२५ अंशांची वाढ झाली आणि तो २१,६५८.६० पातळीवर स्थिरावला.
हेही वाचा >>> विमान प्रवास आता स्वस्त होणार, इंडिगोने इंधन शुल्क लावण्याचा निर्णय घेतला मागे
आघाडीच्या बँकांच्या मजबूत मासिक व्यवसायाच्या ताज्या आकडेवारीनंतर, दोन सत्रातील नुकसान भरून काढत भांडवली बाजारात तेजी परतली. निवासी श्रेणीतील मजबूत मागणीच्या अपेक्षेने आणि बँकांकडून गृहकर्जाला वाढते प्रोत्साहन मिळत असल्याने गृहनिर्माण क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग तेजीत होते, असे मत जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.
सेन्सेक्समध्ये बजाज फायनान्सचा समभाग ४.४४ टक्क्यांनी वधारला. त्यापाठोपाठ एनटीपीसी, इंडसइंड बँक, ॲक्सिस बँक, टाटा मोटर्स, नेस्ले, पॉवर ग्रिड, इन्फोसिस, बजाज फिनसर्व्ह आणि एचडीएफसी बँक यांचे समभाग तेजीत होते. तर एचसीएल टेक, महिंद्र अँड महिंद्र, मारुती आणि हिंदुस्थान युनिलिव्हर या कंपन्यांच्या समभागात घसरण झाली.
हेही वाचा >>> ‘या’ भारतीय टेक कंपनीच्या सीईओने रचला नवा विक्रम, बनला नवीन वर्षातील पहिला अब्जाधीश!
गुंतवणूकदारांच्या झोळीत ३.२४ लाखांची श्रीमंती
गुरुवारच्या सत्रातील तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या झोळीत ३.२४ लाखांची भर पडली. मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल गुरुवार सत्राअखेर ३६८.३२ लाख कोटी रुपयांवर पोहोचले असून त्यात एका सत्रात ३,२४,०१० कोटी रुपयांची वाढ झाली.
सेन्सेक्स ७१,८४७.५७ ४९०.९७ ( ०.६९)
निफ्टी २१,६५८.६० १४१.२५ ( ०.६६)
डॉलर ८३.२३ -७
तेल ७८.९७ – ०.९२