मुंबई : परकियांच्या गुंतवणुकीच्या जोरावर एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, लार्सन अँड टुब्रो आणि बजाज फायनान्स यांसारख्या ब्लूचिप कंपन्यांमध्ये झालेल्या खरेदीमुळे गुरुवारच्या सत्रात सेन्सेक्स ३१८ अंशांनी वधारला.
मासिक वायदे करार समाप्तीच्या दिवशी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ३१७.९३ अंशांनी म्हणजेच ०.४१ टक्क्यांनी वधारून ७७,६०६.४३ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात त्याने ४५८.९६ अंशांची मजल मारत ७७,७४७.४६ या सत्रातील उच्चांकी पातळीला स्पर्श केला होता. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १०५.१० अंशाची वाढ होऊन तो २३,५९१.९५ पातळीवर बंद झाला.
देशांतर्गत आघाडीवर गुरुवारच्या सत्रात आशावाद कायम होता, ज्यामुळे परदेशी निधीचा प्रवाह आणि ब्लूचिप कंपन्यांची समभाग खरेदीचा जोर होता. मात्र, ट्रम्प यांनी लादलेल्या वाहन आयातीवरील २५ टक्के शुल्कामुळे वाहन निर्मिती क्षेत्रासह, औषधी निर्माण क्षेत्रातील चिंता वाढवली आहे. मात्र या आव्हानांना न जुमानता, निर्देशांकांनी दमदार आगेकूच कायम राखली. महागाईत झालेली घसरण पाहता व्याजदर कपातीच्या शक्यतेने देशांतर्गत मूलभूत सुधारणा होण्याची अपेक्षा आहे, असे जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले.
सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांमध्ये बजाज फिनसर्व्ह, इंडसइंड बँक, एनटीपीसी, लार्सन अँड टुब्रो, अल्ट्राटेक सिमेंट, अदानी पोर्ट्स, बजाज फायनान्स, पॉवर ग्रिड, झोमॅटो, स्टेट बँक, एचडीएफसी बँक आणि टायटन यांचे समभाग तेजीसह बंद झाले. तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परदेशातून आयात केलेल्या प्रवासी वाहनांवर २५ टक्के कर लादण्याची घोषणा केल्यानंतर टाटा मोटर्सचे समभाग ५.५ टक्क्यांहून अधिक घसरले. त्यापाठोपाठ सन फार्मा, कोटक महिंद्र बँक, भारती एअरटेल, एचसीएल टेक आणि महिंद्र अँड महिंद्रचे समभाग घसरणीसह बंद झाले. बाजार मंचाच्या आकडेवारीनुसार, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) बुधवारी २,२४०.५५ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची खरेदी केली.
सेन्सेक्स ७७,६०६.४३ ३१७.९३ ०.४१%
निफ्टी २३,५९१.९५ १०५.१० ०.४५%
तेल ७३.६२ -०.२३%
डॉलर ८५.७७ ८ पैसे