मुंबई : भांडवली बाजारात प्रमुख निर्देशांकांची उच्चांकी दौड कायम असून मंगळवारच्या सत्रात ‘सेन्सेक्स’ने ३४९ अंशांची कमाई केली आणि सलग सहाव्या सत्रात दोन्ही निर्देशांक सकारात्मक पातळीवर स्थिरावले. बँकिंग आणि ग्राहकोपयोगी वस्तू कंपन्यांच्या समभागांमधील खरेदीने निर्देशांकांतील तेजी कायम आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> Gold-Silver Price on 20 February 2024: सोन्या-चांदीच्या दरात बदल! खरेदीआधी तपासा आजचे भाव

सेन्सेक्सने सुरुवातीच्या सत्रातील घसरण सावरत अस्थिर सत्रात ३४९.२४ अंशांनी वधारून ७३,०५७.४० पातळीवर बंद झाला. सेन्सेक्समधील आघाडीच्या ३० कंपन्यांपैकी १८ कंपन्यांचे समभाग सकारात्मक पातळीवर स्थिरावले. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ७४.७० अंशांची वाढ झाली आणि तो २२,१९६.९५ या नवीन विक्रमी पातळीवर बंद झाला. दिवसभरातील सत्रात त्याने २२,२१५.६० या सर्वोच्च शिखराला स्पर्श केला. सलग सहा सत्रांत सुरू राहिलेल्या आगेकूचीने निफ्टीने ५८० अंशांची तर सेन्सेक्सने १,९८४ अंशांची कमाई केली आहे.

देशांतर्गत बाजार पुन्हा एकदा विक्रमी उच्चांक गाठण्यासाठी सज्ज झाला आहे. बँकिंग क्षेत्रातील नफ्यामुळे अलीकडील बाजाराच्या वरच्या दिशेने मुसंडीला चालना दिली आहे, अलीकडील तीव्र सुधारणांमुळे खासगी बँकांनीही पुनरागमन केले आहे. तथापि, स्मॉल आणि मिड कॅपमधील घसरण, चढ्या मूल्यांकनामुळे गुंतवणूकदार सावधगिरी बाळगत असल्याचेही सुचवत आहे. या आठवड्यात अमेरिकी मध्यवर्ती बँक – फेडरल रिझर्व्हच्या बैठकीतील इतिवृत्तान्ताकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे, असे मत जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधनप्रमुख विनोद नायर म्हणाले.

हेही वाचा >>> मेहुल चोक्सी प्रवर्तित गीतांजली जेम्स अखेर नामशेष, कंपनीला मोडीत काढण्याचे ‘एनसीएलटी’चे आदेश

सेन्सेक्समध्ये एचडीएफसी बँक, ॲक्सिस बँक, कोटक बँक, इंडसइंड बँक आणि आयसीआयसीआय बँक यांचे समभाग सर्वाधिक तेजीत होते. त्यापाठोपाठ एनटीपीसी, नेस्ले आणि हिंदुस्थान युनिलिव्हरच्या समभागानेदेखील चांगली कामगिरी केली. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये टीसीएसच्या समभागात १.७५ टक्क्यांची सर्वाधिक घसरण झाली. एचसीएलटेक, इन्फोसिस आणि विप्रोचे समभागही घसरले.

शेअर बाजार आकडेवारी

सेन्सेक्स ७३,०५७.४० ३४९.२४ ( ०.४८%)

निफ्टी २२,१९६.९५ ७४.७० ( ०.३२%)

डॉलर ८२.९५ -६

तेल ८३.०७ -०.५९

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stock market today sensex up 349 point nifty crosses 22200 for the first time print eco news zws
Show comments