मुंबई: मोठ्या पडझडीनंतर सुरुवात चांगली झालेल्या मंगळवारच्या सत्रांत प्रमुख निर्देशांकांनी कमावलेले सर्व काही दिवस संपेपर्यंत गमावले आणि ते नकारात्मक पातळीवर बंद झाले. बँकिंग आणि दूरसंचार क्षेत्रातील समभागांमध्ये झालेल्या घसरणीने निफ्टीने २४,००० अंशांची पातळीही गमावली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भांडवली बाजारात मंगळवारीही मोठ्या प्रमाणावर अस्थिर वातावरण होते. परिणामी सलग तिसऱ्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १६६.३३ अंशांच्या घसरणीसह तो ७८,५९३.०७ पातळीवर बंद झाला. सकाळच्या सत्रात सेन्सेक्सने सकारात्मक पातळीवरून व्यवहाराला सुरुवात करत १०९२.३८ अंशांची मजल मारली आणि ७९,८५२.०८ या सत्रातील उच्चांकी पातळी गाठली होती. मात्र दुपारच्या सत्रात गुंतवणूकदारांनी बँकांच्या समभागांमध्ये नफावसुली केल्याने सेन्सेक्सने ७८,४९६.५७ या सत्रातील नीचांकाला लोळण घेतली. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ६३.०५ अंशांची घसरण झाली आणि तो २४,००० अंशांची महत्त्वाची पातळी मोडत २३,९९२.५५ पातळीवर स्थिरावला.

हेही वाचा >>> Bangladesh Political Crisis: बांगलादेशात अस्थिरता; आता अदाणींच्या ‘त्या’ कराराचं काय होणार? कंपनीचे प्रवक्ते म्हणाले…

देशांतर्गत भांडवली बाजाराने आशियाई बाजारांचे अनुकरण करीत, पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र ही तेजी अल्पकालीन ठरली. जपानचे चलन येनच्या मूल्यात डॉलरच्या तुलनेत वाढ, अमेरिकेतील रोजगारासंबंधी कमकुवत आकडेवारी आणि आशिया खंडातील बांगलादेशासह इतर भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा कायम राखला आहे, असे मत जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधनप्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.

सेन्सेक्समध्ये आघाडीच्या कंपन्यांमध्ये स्टेट बँक, महिंद्र अँड महिंद्र, भारती एअरटेल, टायटन, एचडीएफसी बँक, इंडसइंड बँक, अॅक्सिस बँक आणि बजाज फायनान्सच्या समभागात घसरण झाली. तर जेएसडब्ल्यू स्टील, लार्सन अँड टुब्रो, हिंदुस्तान युनिलिव्हर, एचसीएल टेक्नॉलॉजीज आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग सर्वाधिक वधारले.

विदेशी गुंतवणूकदार विक्रेते

विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी दोन सत्रात १३,४०० कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली आहे. सोमवारच्या पडझडीत त्यांनी १०,०७३ कोटींची गुंतवणूक माघारी नेली. उल्लेखनीय म्हणजे आधीच्या जुलै महिन्यांत त्यांनी बाजारात ३२,३६५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. त्या आधी ४ जूनला लोकसभा निवडणूक निकालाच्या दिवशी झालेल्या पडझडीतही विदेशी गुंतवणूकदारांकडून १२,४३७ कोटींच्या घरात समभाग विक्री झाली होती.

विदेशी गुंतवणूकदार विक्रेते

विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी दोन सत्रात १३,४०० कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली आहे. सोमवारच्या पडझडीत त्यांनी १०,०७३ कोटींची गुंतवणूक माघारी नेली. उल्लेखनीय म्हणजे आधीच्या जुलै महिन्यांत त्यांनी बाजारात ३२,३६५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. त्या आधी ४ जूनला लोकसभा निवडणूक निकालाच्या दिवशी झालेल्या पडझडीतही विदेशी गुंतवणूकदारांकडून १२,४३७ कोटींच्या घरात समभाग विक्री झाली होती.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stock market update bse sensex ends 166 points down nifty settles below 24000 zws