मुंबई : भांडवली बाजारात सलग चौथ्या सत्रात उत्साह कायम आहे. बुधवारच्या सत्रात जागतिक भांडवली बाजारातील सकारात्मक कलामुळे धातू आणि कमॉडिटी कंपन्यांच्या समभागांमध्ये खरेदीमुळे मदत झाली. मात्र दूरसंचार, माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभागात विक्रीचा दवाब वाढल्याने तेजीचा जोर ओसरला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ११४.४९ अंशांनी वाढून ७३,८५२.९४ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात त्याने ३८३.१६ अंशांची कमाई करत त्याने ७४,१२१.६१ या सत्रातील उच्चांकी पातळीला स्पर्श केला होता. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने ३४.४० अंशांची भर घातली आणि तो २२,४०२.४० पातळीवर बंद झाला. उत्तरार्धात वाढलेल्या समभाग विक्रीच्या दबावामुळे निर्देशांकातील प्रारंभिक वाढ कमी झाली.

हेही वाचा >>> कोटक महिंद्र बँकेवर निर्बंध; ऑनलाईन ग्राहक नोंदणी व क्रेडिट कार्ड वितरणावर रिझर्व्ह बँकेची बंदी

आशियातील इतर भांडवली बाजारांच्या तुलनेत देशांतर्गत भांडवली बाजारातील तेजी मर्यादित होती. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या आणि निर्देशांकात सर्वाधिक योगदान राखणाऱ्या कंपन्यांची तिमाही आर्थिक कामगिरी निराशाजनक राहिली आहे. दुसरीकडे उत्पादन आणि सेवा क्षेत्राचा पीएमआय निर्देशांकांचे आकडे सध्या उच्चांकी पातळीवर आहेत. परिणामी देशांतर्गत आघाडीवरील व्यापक बाजारपेठेत उत्साह कायम आहे. तसेच जागतिक पातळीवर, इराण-इस्रायलमधील तणाव निवळत असल्याने आणि खनिज तेलाच्या किमती घसरल्याने गुंतवणूकदारांच्या भावना सकारात्मक बनल्या आहेत, असे जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले. सेन्सेक्समध्ये जेएसडब्ल्यू स्टील, टाटा स्टील, पॉवर ग्रिड, कोटक महिंद्र बँक, अल्ट्राटेक सिमेंट, एनटीपीसी आणि बजाज फायनान्स या कंपन्यांचे समभाग वधारले. तर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टेक महिंद्र, मारुती, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टायटनचे समभाग पिछाडीवर होते. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (एफआयआय) मंगळवारी ३,०४४.५४ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री केली.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stock market update sensex gains 114 pts nifty settles above 22400 print eco news zws
Show comments