मुंबई : देशांतर्गत आघाडीवर ऊर्जा, भांडवली वस्तू क्षेत्रातील समभागांमध्ये गुंतवणूकदारांनी खरेदीचा सपाटा लावल्याने बाजारात सकारात्मक कल दिसून आला, ज्या परिणामी राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने ऐतिहासिक शिखर गाठले. तर मंगळवारच्या सत्रात नकारात्मक पातळीवर स्थिरावलेला सेन्सेक्स १५० अंशांच्या तेजीकडे परतला.

निर्देशांकात सर्वाधिक योगदान राखणाऱ्या एचडीएफसी बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांसारख्या निवडक समभागांमधील तेजीने निर्देशांकांना बळ मिळाले. बुधवारच्या अत्यंत अस्थिर राहिलेल्या सत्रात, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १४९.९८ अंशांनी वधारून ७६,६०६.५७ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात त्याने ५९३.९४ अंशांची कमाई करत ७७,०५०.५३ या उच्चांकी पातळीला स्पर्श केला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १७७.१ अंशांची वाढ झाली आणि त्याने २३,४४१.९५ या त्याचा नवीन उच्चांक प्रस्थापित केला. दिवसअखेर मात्र तो ५८.१० अंशांनी वधारून २३,३२२.९५ या शिखरावर विसावला.

हेही वाचा >>> किरकोळ महागाई दराचा वार्षिक नीचांक; मे महिन्यांत ४.७५ टक्के; खाद्यवस्तूंचे स्थिरावलेले भाव उपकारक

अमेरिकेतील महागाई दराबाबत आकडेवारी आणि फेडरल रिझर्व्हच्या बैठकीपूर्वी, जागतिक बाजार सकारात्मक राहिले. अमेरिकेतील महागाई दर स्थिर राहण्याची अपेक्षा आहे. मात्र दर कपातीचा निर्णय आधीच्या फेडरल रिझर्व्हच्या वर्षातील उर्वरित तीन बैठकांपैकी, दुसऱ्या बैठकीनंतर घेतला जाण्याची शक्यता आहे. देशांतर्गत बाजार आगामी अर्थसंकल्पाकडून अपेक्षा राखत नवीन उच्चांक गाठत आहे. तर रिझर्व्ह बँकेने विकासदर वाढीच्या अंदाजात वाढ केल्याने बाजरात उत्साहाचे वातावरण आहे, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस संशोधनप्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

सेन्सेक्समध्ये पॉवरग्रिडचा समभाग २.५४ टक्क्यांनी वधारला. त्यापाठोपाठ टेक महिंद्र, बजाज फायनान्स, एनटीपीसी, अल्ट्राटेक सिमेंट, लार्सन अँड टुब्रो, टाटा स्टील, भारती एअरटेल, बजाज फिनसर्व्ह आणि एचसीएल टेक्नॉलॉजीजचे समभाग सर्वाधिक तेजीत होते. दुसरीकडे, महिंद्र अँड महिंद्र, हिंदुस्तान युनिलिव्हर, इन्फोसिस आणि टायटनचे समभाग पिछाडीवर होते.

हेही वाचा >>> औद्योगिक उत्पादन दराचा तिमाही तळ

बीएसईचे बाजारभांडवल ४२९ लाख कोटींवर

मुंबई शेअर बाजारातील (बीएसई) सूचिबद्ध कंपन्यांचे बाजारभांडवल ४२९.३२ लाख कोटी रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचले आहे. प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स नवीन उच्चांकापासून अवघे २८ अंश दूर आहे. याआधी गेल्या आठवड्यात सेन्सेक्सने ७७,०७९.०४ ही ऐतिहासिक उच्चांकी पातळी गाठली होती. मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांच्या बाजारभांडवलाने ५.१४ लाख कोटी डॉलरचा (ट्रिलियन डॉलर) टप्पा गाठला आहे.

सेन्सेक्स ७६,६०६.५७ १४९.९८ ( ०.२०%)

निफ्टी २३,३२२.९५ ५८.१० ( ०.२५%)

डॉलर ८३.५६ -३

तेल ८२.८७ १.१६