मुंबई : निर्देशांकातील आघाडीच्या कंपन्यांमधील तेजीने सेन्सेक्स आणि निफ्टीला बळ मिळाले. जागतिक बाजारातील मजबूत कल आणि एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीजसारख्या ब्लूचिप समभागांमध्ये झालेल्या चौफेर खरेदीमुळे मंगळवारी सलग तिसऱ्या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये तेजीचे वातावरण होते. दुसरीकडे मात्र रुपयाने डॉलरच्या तुलनेत नवीन तळ गाठला.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये ५९७.६७ अंशांची वाढ झाली आणि तो ८०,८४५.७५ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात तो ७०१.०२ अंशांनी वधारून ८०,९४९.१० या सत्रातील उच्चांकी पातळीवर पोहोचला होता. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १८१.१० अंशांनी वधारून २४,४५७.१५ पातळीवर बंद झाला.
हेही वाचा >>> SBI Mutual Fund : एसबीआय म्युच्युअल फंडाकडून नवीन गुंतवणूक योजना
सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांमध्ये अदानी पोर्टचा समभाग सुमारे ६ टक्क्यांनी वधारला. त्यापाठोपाठ एनटीपीसी, ॲक्सिस बँक, स्टेट बँक, लार्सन अँड टुब्रो, अल्ट्राटेक सिमेंट, टाटा मोटर्स, एचडीएफसी बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे समभाग सर्वाधिक तेजीत होते. तर तेजीचा कल असताना भारती एअरटेल, आयटीसी, सन फार्मा, एशियन पेंट्स आणि कोटक महिंद्र बँक यांची कामगिरी निराशाजनक राहिली. सोमवारच्या सत्रात, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ३,५८८.६६ कोटी रुपये मूल्याचे समभाग खरेदी केले.
हेही वाचा >>> विद्यमान वर्षात ‘आयपीओं’चा शतकी विक्रम!
रुपयाचा नवीन तळ
डॉलरच्या तुलनेत रुपयाने मंगळवारच्या सत्रात ८४.७६ या ऐतिहासिक नीचांकी पातळीला स्पर्श केला. मात्र देशांतर्गत भांडवली बाजारातील तेजीने अखेरच्या काही तासात रुपया डॉलरच्या तुलनेत तो ३ पैशांनी सावरून ८४.६९ पातळीवर बंद झाला. आंतरबँक चलन व्यवहारात मंगळवारी रुपयाने ८४.७५ या कमकुवत पातळीवरून व्यवहाराला सुरुवात केली आणि ८४.७६ हा नवीन तळ दाखविला होता. डोनाल्ड ट्रम्प यांचे ब्रिक्सच्या चलनासंबंधाने इशारा, युरोझोनमधील राजकीय अस्थिरता, देशांतर्गत समष्टी आर्थिक स्थिती कमकुवत बनल्याचे सुचविणारे निर्देशक आणि परदेशी निधीच्या निर्गमनामुळे रुपयात घसरण सुरू आहे.
ट्रम्प यांनी शनिवारी ब्रिक्स राष्ट्रांनी अमेरिकन डॉलरचे नुकसान करणारी कृती केल्यास त्यांच्यावर १०० टक्के सीमाशुल्क आकारण्याची धमकी दिली होती. शिवाय, गुंतवणूकदार आता ६ डिसेंबरच्या रिझर्व्ह बँकेच्या आगामी पतधोरण बैठकीतून पुढे येणाऱ्या संकेतांचीही वाट पाहत आहेत.
सेन्सेक्स ८०,८४५.७५ ५९७.६७ ( ०.७४%)
निफ्टी २४,४५७.१५ १८१.१० ( ०.७५%)
डॉलर ८४.६९ ३ पैसे
तेल ७२.६४ १.१३