मुंबईः भांडवली बाजाराचे प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स-निफ्टी यांनी मागील काही सत्रांमधील घसरण मालिकेपासून फारकत घेत शुक्रवारी तब्बल अडीच टक्क्यांच्या मुसंडी घेतली. चालू वर्षात जूननंतर निर्देशांकांसाठी हा सर्वाधिक कमाईचा दिवस ठरला. तथापि बाजारातील या आकस्मिक खरेदी उत्साहाकडे, बहुतांश मतदानोत्तर चाचण्यांमध्ये राज्यातील विधानसभा निवडणुकांत महायुतीची सत्ता येईल या अंदाजांचा परिणाम म्हणून पाहणे निव्वळ योगायोग असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

शुक्रवारची बाजारातील उसळी ही लोकसभा निवडणुकांबाबत मतदानोत्तर चाचण्यांच्या अंदाजांवर प्रतिक्रिया म्हणून ३ जून २०२४ ला बाजारात दिसलेल्या हर्षोल्हासाशी बरोबरी साधणारी, सेन्सेक्स-निफ्टीची त्यानंतरची सर्वोत्तम कामगिरी आहे, हा देखील योगायोगच आहे. लोकसभा निवडणुकांच्या वेळी विविध वृत्तवाहिन्या आणि संस्थांच्या मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज हे भाजप सरकार तिसऱ्यांदा दमदार बहुमताने सत्तेवर येणार असे होते. परिणामी सेन्सेक्स २,५०७ अंशांनी (३.३९ टक्के) उसळला होता. परंतु प्रत्यक्ष मतमोजणीच्या दिवशी अंदाजाच्या विपरित भाजपला बहुमतासाठी पुरेशा जागा मिळत नसल्याचे दिसताच बाजाराला निराशेने घेरले आणि ४ जूनला सेन्सेक्स तब्बल ४,००० अंशांनी गडगडला आणि गुंतवणूकदारांना ३१ लाख कोटी रुपयांच्या संपत्तीच्या चुराडा होत असल्याचे पाहावे लागले.

हेही वाचा : ‘सेबी’कडून प्रकटन नियमाच्या उल्लंघनाची चौकशी

महायुतीच्या पारड्यात सत्ता देणारे विविध संस्थांचे अंदाज बुधवारी सायंकाळी जाहीर झाले. मात्र गुरुवारच्या बाजारातील सत्रावर अब्जाधीश गौतम अदानी यांच्यावरील लाचखोरीचा अमेरिकेच्या ठपक्याचा धसका मोठा होता. तरी दिवसांतील नीचांकापासून निम्म्याने सावरून सेन्सेक्स त्या दिवशी ४२२ अंशांच्या घसरणीसह स्थिरावला.

शुक्रवारच्या सेन्सेक्स-निफ्टीच्या मोठ्या मुसंडीमागे देशा-विदेशातील आर्थिक-राजकीय घडामोडी आणि नाट्यांचा प्रभाव आहे. विशेषतः अमेरिकेतील रोजगारवाढीचे सकारात्मक चित्र, जपानमधील अर्थ-प्रोत्साहन आणि निवळत असलेला भू-राजकीय तणाव यामागे आहे, असे मोतीलाल ओस्वाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे, संशोधन प्रमुख (संपत्ती व्यवस्थापन) सिद्धार्थ खेमका म्हणाले. निवडणूक मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज हे गोंधळलेले आणि ते लोकसभा निवडणुकांपासून नंतर पुढे वारंवार चुकीचे येतात असे दिसल्याने, त्याबाबत बाजाराचा कल आता सावधगिरीचा बनला असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्र हे देशातील दुसरे मोठे राज्य आणि महत्त्वाचे आर्थिक केंद्र असल्याने त्या राज्यातील सत्ताकारणासंबंधाने बाजाराची प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक असले तरी प्रत्यक्ष निकालानंतर सोमवारच्या सत्रातच ती दिसून येईल, असे खेमका यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : आरोपांमुळे अदानी कंपन्यांवरील विश्वासार्हतेवर परिणाम शक्य : एस ॲण्ड पी

जागतिक दलाली पेढी मॅक्वायरी यांनी ताज्या टिपणांत, लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्राचा कौल हा देशापेक्षा वेगळा व प्रतिकूल आल्याने, केंद्रातील एनडीए सरकारची विधानसभेचे निकालांबाबत उत्सुकता असणे स्वाभाविक आहे. सर्वाधिक शहरीकरण झालेले, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष करांपोटी सर्वाधिक योगदान देणारे, राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत ३० टक्के अधिक दरडोई उत्पन्न असलेले, सर्वाधिक नवोद्यमी उपक्रम (स्टार्टअप्स) असलेले तसेच सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक आकर्षित करणारे राज्य केंद्रासाठी आर्थिक तसेच राजकीय स्थिरतेसाठी महत्त्वाचे असल्याचे मॅक्वायरीने टिपणांत नमूद केले आहे.

Story img Loader