मुंबई : सलग दोन सत्रांतील तेजीनंतर सप्ताहअखेर गुंतवणूकदारांनी नफावसुलीला प्राधान्य दिल्याने प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी १ टक्क्याच्या घसरणीसह बंद झाले. येत्या आठवड्यात कंपन्यांच्या तिमाही आर्थिक कामगिरीचा हंगाम सुरू होणार असल्याने त्याआधी गुंतवणूकदारांनी बँक आणि माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभागांमध्ये विक्रीचा मारा केला.
शुक्रवारच्या सत्रात सकारात्मक सुरुवात होऊनही, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ७२०.६० अंशांच्या घसरणीच्या ७९,२२३.११ पातळीवर बंद झाला. दिवसभरात त्याने ८३३.९८ अंश गमावत ७९,१०९.७३ या सत्रातील नीचांकी पातळीला स्पर्श केला होता. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १८३.९० अंशांची घसरण झाली आणि तो २४,००४.७५ पातळीवर बंद झाला. सरलेला सप्ताह गुंतवणूकदारांसाठी सकारात्मक ठरला. कारण साप्ताहिक आधारावर, सेन्सेक्सने ५२४.०४ आणि निफ्टीने १९१.३५ अंशांची कमाई केली आहे.
मजबूत डॉलर, कंपन्यांचे वाढलेले मूल्यांकन आणि बहु-मालमत्ता वर्गांमध्ये गुंतवणुकीच्या धोरणामुळे भांडवली बाजारात समभाग विक्रीचा मारा सुरू आहे. अमेरिकेतील घटते बेरोजगार दावे आणि राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांच्या येण्यामुळे नजीकच्या काळात धोरण बदलदेखील अपेक्षित असल्याने फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची शक्यता कमी झाली आहे. शिवाय गुंतवणूकदारांचे आता कंपन्यांच्या तिसऱ्या तिमाहीतील आर्थिक कामगिरीवर सावधपणे लक्ष वळले आहे, असे निरीक्षण जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.
हेही वाचा : कर्ज स्वस्त होणार; रिझर्व्ह बँकेकडून सहामाहीत अर्धा टक्के व्याज दरकपात शक्य
सेन्सेक्समध्ये झोमॅटो, एचडीएफसी बँक, टेक महिंद्र, अदानी पोर्ट्स, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, आयसीआयसीआय बँक, सन फार्मा, लार्सन अँड टुब्रो, एचसीएल टेक आणि आयटीसी या कंपन्यांच्या समभागात सर्वाधिक घसरण झाली. दुसरीकडे, टाटा मोटर्स, नेस्ले, टायटन, हिंदुस्तान युनिलिव्हर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग मात्र वधारले होते. अलीकडच्या काळात निव्वळ विक्रेते राहिल्यानंतर परदेशी संस्थागत गुंतवणूकदार (एफआयआय) गुरुवारी निव्वळ खरेदीदार झाले. त्यांनी १,५०६.७५ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची खरेदी केली.
हेही वाचा : देशात अतिदारिद्र्याचे नाममात्र अस्तित्व, स्टेट बँक संशोधन टिपणाचा दावा
सेन्सेक्स ७९,२२३.११ – ७२०.६० (-०.९०%)
निफ्टी २४,००४.७५ – १८३.९० (-०.७६%)
डॉलर ८५.७९ ४ पैसे
तेल ७५.६० -०.४३