मुंबई: अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने विद्यमान २०२४ सालात तीनदा व्याजदर कपातीचे संकेत दिल्यानंतर तेथील भांडवली बाजारांनी विक्रमी उच्चांकी पातळी गाठली. त्याचे सकारात्मक पडसाद देशांतर्गत भांडवली बाजारावर उमटले. निर्देशांकात सर्वाधिक वजन राखणाऱ्या लार्सन अँड टुब्रो, आयटीसी आणि मारुती यांच्या समभागांमध्ये गुंतवणूकदारांनी खरेदीचा सपाटा लावला.
दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये १९०.७५ अंशांची भर पडली आणि तो ७२,८३१.९४ वर स्थिरावला. मात्र माहिती तंत्रज्ञान (आयटी) आणि टेक कंपन्यांच्या समभागांमध्ये तीव्र घसरणीमुळे निर्देशांकाची वाढ मर्यादित राहिली. दिवसभरात सेन्सेक्स ४७४.४३ अंशांची भर घालत ७३,११५.६२ अंशांची सत्रातील उच्चांकी पातळीवर पोहोचला होतो. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ८४.८० अंशांची वाढ झाली. तो २२,०९६.७५ पातळीवर बंद झाला.
हेही वाचा >>> कौशल्य प्रशिक्षणावर ५,००० कोटी खर्च करण्याची बजाज समूहाची घोषणा
देशांतर्गत भांडवली बाजाराने सुरुवातीच्या घसरणीतून झपाट्याने सावरत अखेरच्या काही तासात सकारात्मक मार्गक्रमण कायम राखले, बँक ऑफ इंग्लडकडून व्याजदर कपातीबाबत सकारात्मक संकेत आणि अलीकडील विक्रीच्या माऱ्याच्या पार्श्वभूमीवर खालच्या स्तरावर झालेली समभाग खरेदी आणि अनुकूल जागतिक संकेतांमुळे देशांतर्गत भांडवली बाजारात उत्साहाचे वातावरण होते. याबरोबरच अलीकडील उच्चांकावरून खनिज तेलाच्या किमती खाली आल्याने सकारात्मक भावना निर्माण झाल्या. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्र वगळता बहुतांश क्षेत्रांनी वाढ नोंदवली, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.
सेन्सेक्समध्ये सन फार्मा, मारुती, इंडसइंड बँक, टायटन, आयटीसी, टाटा मोटर्स, लार्सन अँड टुब्रो आणि जेएसडब्ल्यू स्टीलचे समभाग तेजीत होते. दुसरीकडे, इन्फोसिस, विप्रो, एचसीएल टेक्नॉलॉजीज, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टेक महिंद्र आणि बजाज फिनसर्व्हच्या समभागात सर्वाधिक घसरण झाली. बीएसई आयटी निर्देशांक देखील २ टक्क्यांनी घसरला.
सेन्सेक्स ७२,८३१.९४ -१९०.७५ (०.२६%)
निफ्टी २२,०९६.७५ -८४.८० (०.३९%)
डॉलर ८३.४८ -३५
तेल ८५.५९ -०.२२