मुंबई: ‘चंद्रयान-३’ने यशस्वीरीत्या चंद्राच्या पृष्ठभागावर पाऊल ठेवले. मात्र त्याआधी देशांतर्गत भांडवली बाजारात बुधवारच्या सत्रात अंतराळ आणि संरक्षण क्षेत्राशी संबंधित कंपन्यांच्या समभागांना मोठी मागणी दिसून आली आणि त्यांचे भाव वधारले. ‘चंद्रयान-३’ चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यापूर्वी बाजारातील गुंतवणूकदारांनी बुधवारच्या सत्रात लार्सन अँड टुब्रो, एमटीएआर टेक्नॉलॉजीज आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स सारख्या संरक्षण क्षेत्राशी निगडित कंपन्यांवर चढाई केली, असे स्टॉक्सबॉक्सचे टेक्निकल आणि डेरिव्हेटिव्ह विश्लेषक रिचेस वनारा म्हणाले. भारताने संध्याकाळी ६.०४ वाजता चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ‘चंद्रयान-३’ यशस्वीरीत्या उतरविले. चंद्रावर पाऊल ठेवणाऱ्या आघाडीच्या चार देशांमध्ये सामील झाला आहे. तर दक्षिण ध्रुवावर यान उतरणारा पहिला देश बनला आहे.
भांडवली बाजारात सेंटम इलेक्ट्रॉनिक्सचा समभाग १४.९१ टक्क्यांनी म्हणेजच २०४.२५ रुपयांनी वधारून १,६४३.४५ रुपयांवर बंद झाला. कंपनीच्या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, सेंटमने ‘चंद्रयान-३’ मोहिमेसाठी २०० हून अधिक मिशन क्रिटिकल मॉड्यूल तयार केली आहेत. पारस डिफेन्स ॲण्ड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या समभागाने ५.४७ टक्क्यांची झेप घेत ७१७.७० रुपयांची पातळी गाठली. तर एमटीएआर टेक्नॉलॉजीज ४.८४ टक्क्यांनी आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ३.५७ टक्क्यांनी वधारला. तसेच भारत फोर्जचे समभाग २.८२ टक्क्यांनी, ॲस्ट्रा मायक्रोवेव्ह प्रॉडक्ट्स १.७२ टक्के आणि लार्सन अँड टुब्रोचा समभाग १.४२ टक्के तेजीत होता. यातील बहुतांश कंपन्यांनी त्यांची ५२ आठवड्यातील उच्चांकी पातळी गाठली आहे.