Sudheer Koneru success story : बर्‍याचदा लोक निवृत्त होऊन सुखासीन आयुष्य जगण्याचे ठरवतात. लवकर निवृत्त होऊन ते त्यांचे उर्वरित आयुष्य शांततेत घालवू इच्छितात. प्रत्येक जण ४५-५० व्या वर्षी निवृत्त होऊन अडचणींशिवाय जीवन जगण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम बनू शकत नाही. परंतु याला सुधीर कोनेरू अपवाद आहेत. जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या मायक्रोसॉफ्टमध्ये नोकरी असूनही त्यांनी २००८ मध्ये निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्यांचे वय अवघे ४० वर्षे होते. बहुतेक व्यवसायांमध्ये ४० हे वय असते, जेव्हा एखाद्या व्यक्तीचे करिअर शिखराकडे जात असते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुधीरने आयआयटी मद्रासमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये अभियांत्रिकीची पदवी घेतली. त्यानंतर ते अमेरिकेत गेले आणि तेथील टेक्सास विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी घेतली. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात मायक्रोसॉफ्टमधून केली. तिथं ते त्यांच्या कर्तृत्वाने डायरेक्टर पदापर्यंत पोहोचले. मात्र, त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि स्वत:ची कंपनी सुरू केली.

३ कंपन्यांचे संस्थापक

सुधीर यांनी आतापर्यंत एकूण तीन कंपन्या स्थापन केल्या आहेत. यापैकी २ त्यांनी फार पूर्वी विकल्या होत्या. मायक्रोसॉफ्ट सोडल्यानंतर त्यांनी पहिली कंपनी इंटेलिप्रेप टेक्नॉलॉजीज स्थापन केली. काही काळ ते या कंपनीचे सीईओही होते. पुढे ही कंपनी Click2learn मध्ये विलीन झाली. Click2Learn ही पॉल अॅलन यांची कंपनी होती, जे Microsoft चे सह-संस्थापक देखील होते. यानंतर त्यांनी समटोटल नावाची कंपनी स्थापन केली. या कंपनीने सुमारे १०० दशलक्ष डॉलर महसूल मिळवण्यास सुरुवात केली होती, २००७ मध्ये त्यांनी तीदेखील सोडली. २००८ मध्ये त्यांनी निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला.

निवृत्तीनंतर पुन्हा झाले सक्रिय

सुधीर यांनी निवृत्ती नक्कीच घेतली आहे, पण कदाचित ते निवृत्ती घ्यायला अद्यापही तयार नाहीत. सुधीर कोनरू जवळपास २ वर्षांच्या अज्ञातवासानंतर पुन्हा एकदा परतले आणि यावेळी त्यांचा व्यवसाय मागील २ कंपन्यांपेक्षा खूपच चांगला असल्याचे सिद्ध झाले. वेलनेस, स्पा आणि सलून लक्षात घेऊन त्यांनी ManageMySpa नावाचे सॉफ्टवेअर तयार केले. २०१५ मध्ये कंपनीचे नाव बदलून झेनोटी करण्यात आले. २०२० मध्ये ही कंपनी युनिकॉर्न बनली. लक्षणीय म्हणजे १ बिलियन डॉलरपेक्षा जास्त मूल्यांकन असलेल्या स्टार्टअपला युनिकॉर्न म्हणतात. त्यांचे सॉफ्टवेअर ५० देशांमध्ये वापरले जाते. VentureIntelligence च्या मते, आज त्यांच्या कंपनीचे बाजारमूल्य जवळपास १२,००० कोटी रुपये आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sudheer koneru success story retired at the age of 40 then started his own business and established a company worth 12000 crores vrd