चेन्नई: अशोक लेलँडची विद्युत शक्तीवरील वाहनांच्या निर्मितीतील सहायक कंपनी असलेल्या स्विच मोबिलिटीने खास भारतीय प्रवाशांची सोय ओळखून प्रवेशद्वाराची पदपथापासून उंची कमी असलेल्या अर्थात निम्न तळ (लो-फ्लोअर) इलेक्ट्रिक बसच्या दोन प्रकारांचे बुधवारी अनावरण केले. ‘ईआयव्ही १२’ ही देशातील लो-फ्लोअर या प्रकारातील पहिलीच सिटी बस असल्याचा कंपनीचा दावा आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या वाहनाचे दूरस्थ माध्यमांतून अनावरण करण्यात आले. या वेळी हिंदुजा कंपनी समूहाचे अध्यक्ष अशोक पी. हिंदुजा, इतर मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा : किरकोळ महागाई दराची उसंत, नोव्हेंबरमध्ये ५.४८ टक्क्यांवर घसरण
युरोपीय बाजारपेठेसाठी विकसित केलेली ‘स्विच ई १’ या बसचेदेखील झेंडा दाखवून याप्रसंगी अनावरण करण्यात आले. विशेषतः शहरातील प्रवासासाठी ‘स्विच ईआयव्ही १२’ ही बस सुरक्षितता, विश्वसनीयता आणि आराम या अंगाने जागतिक मानकांची पूर्तता करणारी स्वदेशात विकासित करण्यात आली आहे. ३९ प्रवाशांपर्यंत आसन क्षमता असलेली ही बस तिच्या श्रेणीमध्ये सर्वोत्तम वैशिष्ट्यांसह अग्रगण्य असल्याचे कंपनीने म्हटले आहे. या बस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ दृष्टिकोनाचा भाग आहेत, असे अशोक पी. हिंदुजा म्हणाले. तर देशासाठी ‘स्विच ईआयव्ही १२’ आणि स्पेनसाठी ‘स्विच ई१’ची निर्मिती करणे हे हिंदुजा समूह आणि अशोक लेलँडसाठी अभिमानास्पद आहे, असे स्विच मोबिलिटीचे अध्यक्ष धीरज हिंदुजा म्हणाले.
हेही वाचा : चाकणमध्ये हायड्रोजन वाहन इंजिन चाचणी सुविधा
देशातील इलेक्ट्रिक सिटी बस बाजारपेठ ही २०३० पर्यंत २१ टक्के चक्रवाढ दराने वाढत जाण्याची अपेक्षा आहे आणि २०३० पर्यंत त्यांची संख्या ७० हजारांचा टप्पा ओलांडेल, असा अंदाज आहे.