लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबई : म्युच्युअल फंड हा गुंतवणूक पर्याय सर्वतोमुखी करणाऱ्या नियोजनबद्ध गुंतवणुकीच्या अर्थात ‘एसआयपी’ची लोकप्रियता शिखरावर पोहोचली असून, सरलेल्या सप्टेंबर महिन्यात ‘एसआयपी’च्या माध्यमातून गुंतवणूक १६,४०२ कोटी रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. आधीच्या ऑगस्ट महिन्यातील १५,८१४ कोटी रुपयांचा विक्रम तिने मोडीत काढला.
म्युच्युअल फंड उद्योगाची शिखर संस्था ‘ॲम्फी’ने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, सप्टेंबर महिन्यात म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदारांच्या संख्याही ४ कोटींच्या पुढे गेली आहे. एप्रिल ते सप्टेंबर या चालू आर्थिक वर्षाच्या सहा महिन्यांत मासिक सरासरी १५,०५० कोटी रुपयांप्रमाणे एकूण ‘एसआयपी’तील योगदान ९०,३०४ कोटी रुपये इतके राहिल्याचे ‘ॲम्फी’ने स्पष्ट केले.
हेही वाचा… निवांत निवृत्त जीवनासाठी आर्थिक नियोजनाचा उलगडा, पार्ल्यात आज सायंकाळी ‘लोकसत्ता अर्थभान’चे सत्र
समभागसंलग्न अर्थात इक्विटी म्युच्युअल फंडांत सलग ३१ व्या महिन्यात सप्टेंबरमध्ये सकारात्मक प्रवाह राहिला आहे. मात्र ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत त्यात किरकोळ घट झाली असली तरी सप्टेंबरमध्ये १३,८५७ कोटींची गुंतवणूक झाली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप दोन्ही फंडांमध्ये सप्टेंबरमध्ये आवक चांगली राहिली असली तरी ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत गुंतवणूक घटली आहे. मात्र लार्जकॅप फंडातून मोठ्या प्रमाणावर निधी काढून घेण्यात आला. स्मॉलकॅप फंडांमध्ये सप्टेंबरमध्ये २,६७८ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली, त्या आधीच्या महिन्यात ४,२६५ कोटींची आवक झाली होती आणि मिडकॅप फंडातील गुंतवणूक ऑगस्टमधील २,५१२ कोटींवरून कमी होत सप्टेंबर महिन्यात २,००१ कोटींवर मर्यादित राहिली.
हेही वाचा… ‘टीसीएस’ची १७ हजार कोटींची ‘बायबॅक’ योजना; प्रत्येकी ४,१५० रुपये किमतीला समभाग खरेदी
इक्विटी म्युच्युअल फंडांत सप्टेंबरमध्ये ६ नवीन फंड दाखल झाले. परिणामी, त्या माध्यमातून २,५०३ कोटी रुपयांची नव्याने गुंतवणूक झाली. एक्स्चेंज ट्रेडेड फंडाच्या (ईटीएफ) माध्यमातून या महिन्यांत ३,२४३ कोटी रुपयांची गुंतवणूक आली. त्याआधीच्या महिन्यात ईटीएफमार्फत १,८६३ कोटी रुपयांचा ओघ राहिला होता. तसेच कॉर्पोरेट बाँड फंडातून सप्टेंबरमध्ये २,४६० कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेण्यात आली. ऑगस्टमध्ये त्यात १,७५५ कोटींची भर पडली होती.
हेही वाचा… नाडेला, पिचई यांना मागे टाकत श्रीमंत व्यवस्थापकांमध्ये जयश्री उल्लाल अव्वल स्थानी
विक्रमी ‘एसआयपी’ योगदान हे गुंतवणूकदारांमधील वाढत्या विश्वासार्हतेचे प्रतीक आहे. गेल्या काही महिन्यांपासून विदेशी गुंतवणूकदारांकडून भांडवली बाजारात विक्री सुरू असताना, भारतीय गुंतवणूकदारांनी देशांतर्गत अर्थव्यवस्था आणि बाजारांवर विश्वास दाखविल्याचे आश्वासक चित्रही पुढे आले आहे. एकंदरीत सहामाही वाढ उत्साहवर्धक असून, हा कल उर्वरित वर्षातही कायम राहील. – एनएस व्यंकटेश, मुख्य कार्यकारी अधिकारी, ‘ॲम्फी’