मुंबई : भारतातील क्रमांक दोनची आणि जगातील तिसऱ्या क्रमांकाची ट्रॅक्टर उत्पादक कंपनी असलेल्या चेन्नईस्थित ट्रॅक्टर्स ॲण्ड फार्म इक्विपमेंट लिमिटेड अर्थात टॅफेने, जागतिक आघाडीची ट्रॅक्टर नाममुद्रा मॅसी फर्ग्युसनवरील मालकीहक्काचा दावा बळकट केल्याचे सोमवारी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून स्पष्ट केले.
अमेरिकेतील कृषी उपकरणे निर्मात्या एजीसीओ कॉर्पोरेशनशी सुरू असलेल्या मद्रास उच्च न्यायालयासमोरील वादात टॅफेच्या बाजूने महत्त्वपूर्ण निर्णय आला आहे. न्यायालयाने कोणत्याही पक्षाला सद्यःस्थितीत बदल करण्यापासून प्रतिबंधित करताना, यथास्थिती राखण्याचा अंतरिम आदेश दिला. एजीसीओने दीर्घकाळापासून भागीदार असलेल्या टॅफेशी मॅसी फर्ग्युसन ट्रॅक्टरच्या परवान्यासंबंधी करार एकतर्फी संपुष्टात आणण्याच्या नोटिशीला न्यायालयात आव्हान देणारी याचिका भारतीय उत्पादकाकडून दाखल करण्यात आली आहे.
हेही वाचा >>> वायदे व्यवहाराचे नियम कठोर
टॅफेने १९६० पासून मॅसी फर्ग्युसन ब्रँडच्या ट्रॅक्टर्सकरिता सखोल संशोधन व विकास विभागासह गुणवत्ता नियंत्रणाच्या माध्यमाने भारतीय बाजारपेठेकरिता ५०० पेक्षा अधिक मॉडेल्सची निर्मिती, रचना आणि काळजी घेण्याचे काम केले आहे. गत सहा दशकांहून अधिक काळात लक्षावधी मॅसी फर्ग्युसनच्या उत्पादनांची निर्मिती टॅफेद्वारे भारतात करण्यात येत असून, तब्बल ३० लाख समाधानी ग्राहकांचा विश्वासही कंपनीने संपादित केला आहे. टॅफेने धोरणात्मक निर्णय घेत २०१२ मध्ये एजीसीओतील सर्वात मोठी भागधारक आणि दीर्घकालीन गुंतवणूकदार बनण्यासह, उभयतांतील सहयोगाचे संबंध आणखी मजबूत केले. तथापि, ही दीर्घकालीन भागीदारी असूनही, सध्याच्या विवादाने दोहोंतील तणाव उघड केला. विशेषत: एजीसीओच्या उद्यम कारभाराबद्दल आणि भारतीयसंदर्भात मॅसी फर्ग्युसन नाममुद्रेच्या वागणुकीसंबंधी दोहोंतील वादाचे पर्यवसान न्यायालयीन कज्जांत झाले.