मुंबई, पुण्यासह आठ ८ शहरांमध्ये सेवेस सुरुवात
मुंबईः रिलायन्स जिओने आधी केलेल्या घोषणेप्रमाणे, गणेश चतुर्थीच्या दिवशी देशातील मुंबई, पुण्यासह देशातील आठ महानगरांमध्ये ‘जिओ एअर फायबर’ सेवेला सुरुवात केली. यातून ग्राहकांना बिनतारी अति वेगवान ब्रॉडबॅण्ड तसेच होम एंटरटेनमेंट, स्मार्ट होम सेवांचा लाभ मिळविता येऊ शकेल. कंपनीने पहिल्या टप्प्यात ही सेवा दिल्ली, हैदराबाद, कोलकाता, अहमदाबाद, बेंगळुरू आणि चेन्नई या अन्य महानगरांमध्ये सुरू केली आहे.
जिओची ऑप्टिकल फायबर पायाभूत सुविधा संपूर्ण भारतात १५ लाख किलोमीटरपर्यंत पसरलेली आहे. कंपनीने आतापर्यंत एक कोटींहून अधिक ठिकाणे तिच्या विद्यमान जीओ फायबर सेवेने जोडले आहेत. परंतु जेथे अजूनही जेथे तारांनी युक्त किंवा फायबर जोडणी देणे खूप कठीण आहे अशा क्षेत्रात जिओ एअर फायबर सेवा विनासायास पोहोचू शकेल. म्हणूनच रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी वार्षिक सभेत घोषणा केल्याप्रमाणे, जिओ एअर फायबरच्या माध्यमातून देशभरातील २० कोटी घरे आणि परिसरात पोहोचण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य कंपनीने ठेवले आहे.
कंपनीने एअर फायबर आणि एअर फायबर मॅक्स नावाच्या दोन योजना बाजारात आणल्या आहेत. एअर फायबर योजनेत, ग्राहकाला ३० एमबीपीएस आणि १०० एमबीपीएस असे दोन प्रकारचे वेगाचे पर्याय उपलब्ध करण्यात आले असून, यासाठी अनुक्रमे दरमहा ५९९ रुपये आणि ८९९ रुपये दर निश्चित करण्यात आले आहेत. दोन्ही पर्यायांमध्ये ग्राहकांना ५५० हून अधिक डिजिटल वाहिन्या आणि १४ ओटीटी ॲप्स दिले जातील. तर, एअर फायबर मॅक्स योजनेत, कंपनीने १०० एमबीपीएस वेगासह १,१९९ रुपयांत नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राइम आणि जिओ सिनेमा सारखे प्रीमियम ॲप अतिरिक्त देऊ केले आहेत.