लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबई: माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (टीसीएस) बुधवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ४.०९ कोटी समभागांच्या पुनर्खरेदीच्या (बायबॅक) योजनेला मंजुरी दिली. यावर १७,००० कोटी रुपये कंपनीकडून खर्च केले जाणार आहेत. प्रत्येकी ४,१५० रुपये किमतीला प्रस्तावित ही पुनर्खरेदी म्हणजे टीसीएसच्या ३,६१३ रुपये या बुधवारच्या बंद भावाच्या तुलनेत भागधारकांना १५ टक्क्य़ांचे अधिमूल्य मिळवून देणारी आहे.
गेल्या सहा वर्षांच्या कालावधीत ‘टीसीएस’ने आणलेली ही पाचवी समभाग पुनर्खरेदी योजना आहे. कंपनीने आतापर्यंत चार समभाग पुनर्खरेदी योजनेच्या माध्यमातून भागधारकांकडून ६६,००० कोटी रुपये मूल्याचे समभाग खरेदी केले आहेत.
तिमाही नफा ११,३४२ कोटींवर
सरलेल्या सप्टेंबर तिमाहीत टीसीएसचा निव्वळ नफा वार्षिक आधारावर ८.७ टक्क्यांनी वाढून ११,३४२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्यावर्षी याच तिमाहीत कंपनीने १०,४३१ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला होता. वर्षभरापूर्वीच्या याच तिमाहीतील ५५,३०९ कोटी रुपयांच्या महसुलाच्या तुलनेत सरलेल्या सप्टेंबर तिमाहीत महसूल ७.९ टक्क्यांनी वाढून ५९,६९२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने प्रतिसमभाग ९ रुपयांचा अंतरिम लाभांश देण्याची घोषणा केली आहे.