मुंबई : देशात विद्युत शक्तीवर चालणाऱ्या अर्थात ईव्ही मोटारींसाठी चार्जिंगच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी ‘टाटा डॉट ईव्ही’ने पुढाकार घेतला असून, येत्या दोन वर्षांत अशा सुविधा ४ लाख ठिकाणांवर स्थापित करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

ईव्ही परिसंस्थेला चालना देण्यासाठी ‘ओपन कोलॅबरेशन २.०’अंतर्गत टाटा मोटर्सने हे पाऊल टाकले असून, नवीन ३०,००० सार्वजनिक ठिकाणी चार्जिंग पॉईंट्स स्थापित करण्याच्या उद्देशाने तिने प्रमुख चार्जिंग पॉइंट ऑपरेटर्सशी सहयोग दृढ केला आहे. ज्यामुळे ईव्ही चार्जिंगची व्यापक उपलब्धता, सोय वाढू शकेल.

पहिल्या टप्प्यात दोन वर्षांत ५०० मेगा चार्जर्सचे संचालन सुरू करण्यासाठी टाटा ईव्हीने टाटा पॉवर, चार्जझोन, स्टॅटिक आणि झीऑन यांच्याशी सामंजस्य करार केले आहेत. या सुविधा मुख्य शहरांत आणि महत्त्वाच्या महामार्गांवर स्थापित करण्यात येतील. टाटा.ईव्ही मेगा चार्जर्स सर्व ई-वाहनांसाठी खुले असतील, मात्र टाटा मोटर्सच्या ईव्ही ग्राहकांना येथे कमी दरात आणि प्राधान्याने सेवा दिली जाईल.

टाटा मोटर्सने केवळ जागतिक दर्जाची इलेक्ट्रिक वाहने आणली नाहीत, तर देशभरात एक मजबूत चार्जिंग पायाभूत सुविधेसाठी देखील प्रयत्न सुरू ठेवले, असे टाटा मोटर्सच्या प्रवासी वाहन निर्मिती विभाग आणि टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटीचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्रा म्हणाले. भारतात ई वाहनांसाठी जबरदस्त वाढ सक्षम करण्यासाठी सर्वसमावेशक ‘ओपन कोलॅबरेशन २.०’ सुरू केले असल्याचे त्यांनी नमूद केले.

Story img Loader