वृत्तसंस्था, नवी दिल्ली
रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाने व्यवसाय आणि संपत्ती निर्मितीचा भक्कम वारसा मागे ठेवला आहे. रतन टाटांनी जेव्हा टाटा समूहाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली, तेव्हा त्यांना ९५ हून अधिक वैविध्यपूर्ण कंपन्यांचा समूह वारसाहक्काने प्राप्त झाला.

टाटांनी समूहाची धुरा हाती घेतली त्यावेळी अनेक कंपन्या स्वतंत्रपणे कार्यरत होत्या. त्यांच्यामध्ये अगदी थोड्या समन्वयाने किंवा धोरणात्मक कार्य चालत होते. यातील कंपन्या या रसायने, हॉटेल्स, मीठ, सॉफ्टवेअर, स्टील, साबण आणि घड्याळे अशा विविध व्यवसायांमध्ये कार्यरत होत्या. मात्र त्यांनी सर्व कंपन्यांची मोट बांधत समूहाच्या विकासाच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचे निर्णय घेतले. १९९१ ते २०१२ या टाटा सन्सचे अध्यक्ष म्हणून रतन टाटा यांच्या कार्यकाळात टाटा समूहाचे रूपांतर एका जागतिक महाकाय समूहामध्ये झाले, त्यांच्या नेतृत्वाखाली कंपन्यांचे बाजार भांडवल १७ पटींनी वाढले. रतन टाटा यांनी घेतलेल्या धोरणात्मक निर्णयांमुळे आणि अधिग्रहणांमुळे समूहातील सूचिबद्ध कंपन्यांचे एकत्रित बाजार भांडवल ३० लाख कोटींवर पोहोचले आहे.

हेही वाचा : ‘टीसीएस’ला ११,९०९ कोटींचा तिमाही नफा

रतन टाटा यांच्या कार्यकाळात, टाटा समूहाचा महसूल सुमारे १८,००० कोटी रुपयांवरून ५.५ लाख कोटी रुपयांवर (६ अब्ज डॉलरवरून १०० अब्ज डॉलर) पोहोचला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीच्या आघाडीच्या ५० कंपन्यांमध्ये टाटा समूहातील सहा कंपन्यांच्या समावेश आहे. या सहा कंपन्यांमध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टाटा स्टील, टाटा मोटर्स, टायटन कंपनी, टाटा कन्झ्युमर आणि ट्रेंट- यांचा समावेश होते. टाटा समूहातील अर्धा डझन कंपन्यांचे एकत्रितपणे निर्देशांकावर १० टक्के भारांकन आहे आणि त्यांचे एकत्रित बाजार भांडवल सुमारे २८ लाख कोटी रुपये आहे.

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात टीसीएस ही देशातील सर्वात मोठी माहिती तंत्रज्ञान कंपनी आहे. तिचे एकटीच बाजारभांडवल सुमारे १५.२९ लाख कोटी रुपये आहे. देशातील सर्वात मोठ्या संपत्ती निर्मात्यांपैकी एक असून वर्ष २००४ मध्ये भांडवली बाजारात सूचिबद्ध झाली होती.त्यापाठोपाठ टाटा मोटर्स, टाटा स्टील हे मोठे संपत्तीचे निर्माते ठरले आहेत.

हेही वाचा : बँकिंग समभागांतील तेजीने निर्देशांकांना बळ

रतन टाटा यांनी मार्च १९९१ मध्ये जेआरडी टाटा यांच्याकडून टाटा सन्सचे अध्यक्षपद स्वीकारले आणि कंपनीतील ५० वर्षांच्या कारकिर्दीनंतर डिसेंबर २०१२ मध्ये ते पदावरून पायउतार झाले. टाटा सन्स ही मुख्य गुंतवणूक होल्डिंग कंपनी आणि टाटा कंपन्यांची प्रवर्तक आहे.