ढोलेरा : गुजरातमधील ढोलेरा येथील टाटा इलेक्ट्रॉनिक्सच्या सेमीकंडक्टर प्रकल्पातून २०२६ मध्ये पहिल्या चिपचे उत्पादन होईल, अशी माहिती केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी दिली. टाटा इलेक्ट्रॉनिक्सच्या दोन आणि सीजी पॉवर चिप प्रकल्पाच्या एक अशा तीन सेमीकंडक्टर प्रकल्पाचे भूमिपूजन बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.
हेही वाचा >>> रवींद्रन बैजू यांना न्यायालयाकडून दिलासा; भागधारकांच्या बैठकीतील निर्णयाला २८ मार्चपर्यंत स्थगिती
यातील एकूण गुंतवणूक १ लाख २६ हजार कोटी रुपये आहे. या तीन प्रकल्पांमध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्सच्या देशातील पहिल्या अत्याधुनिक चिप निर्मिती प्रकल्पाचा समावेश आहे. टाटा इलेक्ट्रॉनिक्स आणि तैवानमधील पॉवरचिप सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी यांच्या भागीदारीतून हा प्रकल्प उभा राहात आहे. या प्रकल्पाची उत्पादन क्षमता दरमहा ५० हजार वेफर्स असून, यातील गुंतवणूक ९१ हजार कोटी रुपये आहे.