वृत्तसंस्था, नवी दिल्ली
टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांच्या निधनाने १६५ अब्ज डॉलरच्या टाटा समूहाच्या देखरेखीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या टाटा न्यास (टाटा ट्रस्ट) या संस्थेतही नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली आहे. टाटा सन्समध्ये टाटा ट्रस्टची बहुसंख्य हिस्सेदारी असून आणि त्याचे मानद अध्यक्षपद रतन टाटा यांच्याकडे होते.
टाटा उद्योग समूहाच्या स्थिरतेत टाटा न्यासांची महत्त्वाची भूमिका आहे. टाटा न्यासांमध्ये विशेषत: सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्ट, यांची एकत्रितपणे टाटा सन्समध्ये ६६ टक्के हिस्सेदारी आहे. या न्यासांच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य क्षेत्रात सेवाभावी कार्यासह, दानकर्म केले जाते. रतन टाटा यांच्या पश्चात त्यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा हे नाव या दोन प्रमुख टाटा न्यासांच्या अध्यक्षपदासाठी प्रामुख्याने चर्चेत आहे.
रतन टाटा यांनी त्यांचे उत्तराधिकारी म्हणून कोणाचीही नियुक्ती केली नव्हती आणि उत्तराधिकारी नेमण्याचा निर्णय त्यांनी विश्वस्त मंडळावर सोपवला होता. त्यानुसार नवीन अध्यक्षाची निवड आता विश्वस्तांवर अवलंबून असून, जे उमेदवाराच्या अंतिमत: निवडीपूर्वी, अंतरिम प्रमुखाची नियुक्ती करण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : रतन टाटांच्या कारकिर्दीत समूहाचा महसूल १८,००० कोटी रुपयांवरून ५.५ लाख कोटींवर
पारंपरिकरीत्या, टाटा ट्रस्टचे नेतृत्व टाटा कुटुंब आणि पारशी समुदायाशी संलग्न राहिले आहे. टाटा सन्स आणि टाटा न्यास या दोहोंच्या अध्यक्षपदाची दुहेरी भूमिका हाताळलेले रतन टाटा हे शेवटचे होते. मात्र २०२२ पासून, टाटा सन्सचे अध्यक्ष आणि टाटा न्यासांचे अध्यक्ष या भूमिका स्वतंत्र राहतील याची खात्री करून, विश्वस्त मंडळाच्या रचनेत बदल करण्यात आले. हे बदल टाटा न्यासांचा कारभार अधिक मजबूत करण्याच्या समूहाच्या प्रयत्नांचा एक भाग होता.
प्रमुख दावेदार कोण?
रतन टाटा यांच्या निधनानंतर, टाटा न्यासाचे संभाव्य अध्यक्ष म्हणून समूहातील अनेकांची नावे घेतली जात आहेत. विश्वस्त मंडळावरील अनेकांचा संभाव्य उत्तराधिकारी म्हणून विचार केला जात आहे. टीव्हीएस समूहातील ज्येष्ठ उद्योगपती वेणू श्रीनिवासन आणि माजी संरक्षण सचिव विजय सिंग यांचीही नावे चर्चेत आहेत. दोघेही न्यासाचे उपाध्यक्ष म्हणून सध्या काम करतात आणि वर्ष २०१८ पासून त्यांनी न्यासाच्या कारभारात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तथापि, प्रमुख दावेदारांमध्ये रतन टाटा यांचे सावत्र भाऊ आणि ट्रेंट लिमिटेड या टाटा समूहातील कंपनीचे विद्यमान अध्यक्ष नोएल टाटा हे नाव आहे. टाटा कुटुंबातील सदस्य असणे आणि चार दशकांहून अधिक कालावधीचा टाटा समूहातील त्यांचा व्यापक अनुभव त्यांच्याकडे आहे. नोएल टाटा २०१९ मध्ये सर रतन टाटा ट्रस्टचे विश्वस्त बनले आणि नंतर ते २०२२ मध्ये सर दोराबजी टाटा ट्रस्टच्या विश्वस्त मंडळात सामील झाले. जर त्यांची निवड झाली तर नोएल हे सर दोराबजी टाटा ट्रस्टचे अकरावे आणि सर रतन टाटा ट्रस्टचे सहावे अध्यक्ष असतील.