नवी दिल्ली : टाटा समूहाकडून भारतात देशांतर्गत पुरवठ्यासाठी तसेच विदेशात निर्यातीसाठी आयफोनचे उत्पादन घेतले जाईल, अशी घोषणा केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी शुक्रवारी केली. विस्ट्रॉन कॉर्पोरेशनने बंगळूरुतील आयफोन निर्मिती प्रकल्पाची विक्री टाटा समूहाला करण्यास मंजुरी दिल्यानंतर लगेचच चंद्रशेखर यांनी ही घोषणा केली.
आयफोन निर्मिती करणारी तैवानमधील कंपनी विस्ट्रॉनसोबत टाटा समूहाकडून सुमारे एक वर्षभरापासून बंगळूरुनजीकचा उत्पादन प्रकल्प ताब्यात घेण्याबाबत वाटाघाटी सुरू होत्या. अखेर विस्ट्रॉनने याला मंजुरी दिल्याने हा संपादन व्यवहार मार्गी लागणार आहे. या घडामोडींना दुजोरा देत चंद्रशेखर यांनी समाजमाध्यमावर टिप्पणी करून त्यांची पुष्टी केली. चंद्रशेखर म्हणाले, “टाटा समूहाकडून दोन ते अडीच वर्षांत आयफोनचे उत्पादन सुरू होईल. देशांतर्गत बाजारासोबत आंतरराष्ट्रीय पातळीवरही या प्रकल्पातून आयफोनचा पुरवठा होणार आहे. विस्ट्रॉनचा प्रकल्प ताब्यात घेतल्याबद्दल टाटा समूहाचे अभिनंदन. याचबरोबर ॲपलची जागतिक पुरवठा साखळी भारतात उभी करण्यात दिलेल्या योगदानाबद्दल विस्ट्रॉनचेही आभार.”
हेही वाचा : ईशा, आकाश आणि अनंत अंबानी रिलायन्सच्या बोर्डात होणार सामील, ९० टक्के भागधारकांकडून मंजुरी
केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाकडून जागतिक पातळीवर भारतीय इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांच्या वाढीसाठी पूर्णपणे पाठबळ दिले जात आहे. जागतिक पातळीवरील इलेक्ट्रॉनिक कंपन्या उत्पादन व गुणवत्ता भागीदार म्हणून भारताकडे वळत आहेत, असेही चंद्रशेखर यांनी नमूद केले आहे.
हेही वाचा : मोझांबिकमधून तूर डाळीची अखंड निर्यात सुनिश्चित करण्यासाठी केंद्राची मोझांबिकच्या उच्चायुक्तांशी चर्चा
साडेबारा कोटी डॉलरचा व्यवहार
विस्ट्रॉन इन्फोकॉम मॅन्युफॅक्चरिंग (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी टाटा समूह ताब्यात घेणार आहे. हा व्यवहार १२.५ कोटी डॉलरचा आहे. विस्ट्रॉन कंपनीच्या संचालक मंडळाने या व्यवहाराला मंजुरी दिली आहे. दोन्ही कंपन्यांच्या संमतीनंतर हा व्यवहाराला नियामकांच्या मंजुरीचे सोपस्कार पूर्ण करण्यात येतील.