नवी दिल्ली : आघाडीच्या वाहन कंपन्या असलेल्या टाटा मोटर्स आणि महिंद्र अँड महिंद्रने सर्वाधिक खपाच्या ‘एसयूव्ही’ श्रेणीतील ठरावीक वाहनांच्या किमतींवर सवलतीची घोषणा मंगळवारी केली. ‘एसयूव्ही’ श्रेणीतील २० लाख वाहनांच्या विक्रीचा टप्पा गाठल्यानिमित्त ग्राहकांप्रती कृतज्ञता म्हणून टाटा मोटर्सने किमती कमी केल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> अर्थसंकल्पापूर्वी पंतप्रधान-अर्थतज्ज्ञांची बैठक गुरुवारी

‘एसयूव्ही’ श्रेणीत टाटा मोटर्सने २० लाख वाहनांच्या विक्रीचा टप्पा गाठण्यात, सफारी, हॅरियर, पंच. नेक्सॉन आणि जुन्या काळातील प्रतिष्ठित सिएरा-सफारी यांचे विशेष योगदान राहिले. ग्राहकांच्या अपेक्षांनुसार सर्वोत्तम श्रेणीतील सुरक्षितता, अत्याधुनिक डिझाइन आणि प्रगत तंत्रज्ञान प्रदान करण्याच्या वैशिष्ट्याने या वाहनांना ‘एसयूव्हीचा राजा’ बनवल्याची भावना टाटा मोटर्सकडून करण्यात आली.

कंपनीने हॅरियर १४.९९ लाख रुपये आणि सफारी १५.४९ लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीवर ग्राहकांना १.४० लाख रुपयांपर्यंत सवलत देऊ केली आहे. विद्युत वाहन श्रेणीतील नेक्सॉन-ईव्हीवर १.३० लाख रुपयांपर्यंत सवलत देऊ केली आहे. तर पंच-ईव्हीवर ३०,००० पर्यंतचा लाभ कंपनीने जाहीर केला आहे.

हेही वाचा >>> Stock Market Update: ‘सेन्सेक्स’चे चार शतकी तेजीसह विक्रमी शिखर

महिंद्र अँड महिंद्रनेदेखील त्यांच्या ‘एसयूव्ही’ श्रेणीतील लोकप्रिय एक्सयूव्ही ७०० वाहनाची किंमत १९.४९ कोटी रुपये केली आहे. याआधी तिची मूळ किंमत २१.५४ लाख रुपये होती. एक्सयूव्ही ७०० च्या विक्रीचा दोन लाखांचा टप्पा गाठला गेल्याच्या निमित्ताने तिची सवलतीतील किंमत कंपनीने जाहीर केली आहे. १० जुलैपासून चार महिन्यांच्या कालावधीसाठी या विशेष किमतीत हे वाहन उपलब्ध असेल, असे कंपनीने म्हटले आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tata motors and mahindra and mahindra reduces price of suv print eco news zws