वृत्तसंस्था, नवी दिल्ली
वाहननिर्मिती क्षेत्रातील आघाडीच्या टाटा मोटर्स कंपनीने दुसऱ्या तिमाहीत नफ्यात घट नोंदविली आहे. देशांतर्गत विक्रीसोबतच आलिशान मोटारींच्या विक्रीत घसरण झाल्याचा कंपनीला फटका बसला. टाटा मोटर्सला चालू आर्थिक वर्षातील सप्टेंबरअखेर संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत ३,३४३ कोटी रुपयांचा नफा झाला. गेल्या वर्षी याच तिमाहीच्या तुलनेत नफ्यात ११ टक्के घट नोंदविण्यात आली आहे. कंपनीला ४,३९६ कोटी रुपयांचा नफा होईल, असा अंदाज विश्लेषकांनी वर्तविला होता. टाटा मोटर्स ही देशातील तिसऱ्या क्रमांकाची वाहन निर्माती कंपनी आहे.
मात्र, कंपनीला तिच्या मालकीच्या ब्रिटनमधील जग्वार लँड रोव्हर (जेएलआर) कंपनीवर आपल्या दोन तृतीयांश महसुलावर अवलंबून राहावे लागत आहे. जेएलआरच्या महसुलात एक टक्का आणि विक्रीत १० टक्के घसरण झाली आहे. यामुळे जेएलआरचा करपूर्व नफा ५ टक्क्यांवर आला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत तो ७.३ टक्के होता. टाटा मोटर्सच्या सर्व प्रकारच्या वाहनांच्या विक्रीत घसरण झालेली आहे. याचवेळी जाहिराती आणि मागणी वाढविण्यासाठी होणारा खर्च वाढला आहे. विशेषत: जेएलआरच्या बाबतीत ही वाढ जास्त आहे. ॲल्युमिनियमचा पुरवठा पूर्ववत झाल्यानंतर जेएलआरकडून वितरकांना मोटारींचा पुरवठा वाढून दुसऱ्या सहामाहीत स्थिती सुधारेल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.