नवी दिल्ली : देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने त्यांच्या ठराविक विद्युत वाहनांच्या (ईव्ही) किमतीत घट केली आहे. टाटाच्या नेक्सन आणि टियागो या विद्युत वाहनांच्या किंमती बॅटरी सेलचा खर्च कमी झाल्यामुळे १.२ लाखांपर्यंत कमी केल्या आहेत. नेक्सनची किंमत १.२ लाख रुपयांपर्यंत कमी केली आहे आणि आता वाहनाची किंमत१४.४९ लाख रुपये आहे. त्याचप्रमाणे, टियागोच्या किंमती ७०,००० रुपयांनी कमी केल्या आहेत, ज्याच्या सुरुवातीच्या वाहनांची किंमत आता ७.९९ लाख रुपयांपासून सुरू होत आहे, असे टाटा मोटर्सने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. मात्र नुकत्याच सादर झालेल्या पंच या विद्युत वाहनाच्या प्रस्ताविक किमती अपरिवर्तित राहतील, असेही त्यात म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> ‘सेन्सेक्स’मध्ये ४८२ अंशांची भर; बँकिंग, वित्तीय सेवा आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांमध्ये खरेदीचा सपाटा

बॅटरीचा खर्च हा कोणत्या विद्युत वाहनाच्या एकूण खर्चाचा मोठा भाग असतो. टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटीचे मुख्य वाणिज्य अधिकारी विवेक श्रीवत्स म्हणाले, बॅटरी सेलच्या किमती अलीकडच्या काळात घसरण झाल्यामुळे आणि भविष्यातील संभाव्य कपातीचा विचार करून, ग्राहकांना थेट फायदा देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये विद्युत वाहनांच्या विक्रीने वेग घेतला आहे. विद्युत वाहने अधिक सुलभ आणि स्वस्तात उपलब्ध करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे कंपनीचे ध्येय आहे. वर्ष २०२३ मध्ये, प्रवासी वाहन उद्योगाने नोंदवलेल्या ८ टक्के वाढीच्या तुलनेत विद्युत वाहन विभागाने ९० टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली आहे. वर्ष २०२४ मध्ये ही वाढीची गती कायम राहिली आहे, तसेच जानेवारी २०२४ मध्ये विद्युत वाहनांच्या विक्रीने वार्षिक १०० टक्के वाढ नोंदवली आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tata motors reduce ev prices by up to rs 1 2 lakh print eco news zws
Show comments