बंद पडलेल्या सिंगूर प्रकल्पातील भांडवली गुंतवणुकीची भरपाई म्हणून पश्चिम बंगाल औद्योगिक विकास महामंडळाकडून ७६५.७८ कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईचा निवाडा आपल्या बाजूने आल्याचे टाटा मोटर्सने सोमवारी स्पष्ट केले. तत्कालीन विरोधी पक्षनेत्या ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील झालेल्या आंदोलनाने प्रकल्पासाठी जबरदस्तीने शेतजमीन ताब्यात घेतल्याचा आरोप केल्यानंतर, टाटा मोटर्सने २००८ मध्ये महत्त्वाकांक्षी ‘नॅनो’ कार तयार करण्यासाठी स्थापन केलेल्या सिंगूर प्रकल्पामधून बाहेर पडण्याची घोषणा केली होती.
हेही वाचा… झी एंटरटेन्मेंटचे पुनीत गोएंका यांना दिलासा, महत्त्वाच्या पदधारणेविरुद्ध निर्बंध रद्दबातल
हेही वाचा… ॲपल इंडियाच्या नफ्यात ७७ टक्के वाढ, वार्षिक महसूल ५०,००० कोटी रुपयांच्या वेशीवर
नियामकांकडे दाखल निवेदनांत, टाटा मोटर्सने स्पष्ट केले आहे की, ‘तीन सदस्यीय लवादाच्या न्यायाधिकरणासमोरील प्रलंबित लवादाच्या कार्यवाहीचा निकाल आता देण्यात आला आहे. ३० ऑक्टोबर २०२३ रोजी आलेल्या या निवाड्यानुसार, कंपनीला पश्चिम बंगाल औद्योगिक विकास महामंडळाकडून नुकसानभरपाईपोटी ७६५.७८ कोटी रुपये अधिक ११ टक्के दराने व्याज देण्यात येईल. न्यायाधिकरणाच्या अंतिम निवाड्यासह, लवादाची ही कार्यवाही संपुष्टात आली आहे, असेही कंपनीने म्हटले आहे.