लंडन : ब्रिटनमधील टाटा स्टीलच्या प्रकल्पातील सुमारे १,५०० कर्मचाऱ्यांनी ८ जुलैपासून संप पुकारला आहे. या प्रकरणी कंपनीने युनाईट युनियन या कामगार संघटनेच्या विरोधात कायदेशीर कारवाईचे पाऊल उचलले असून, संपाला आव्हान दिले आहे.
पोर्ट टॅब्लॉट आणि लानवेर्न या ठिकाणी टाटा स्टीलचे दोन प्रकल्प आहेत. यातील पोर्ट टॅब्लॉट प्रकल्पातील दोन झोतभट्टी बंद करण्याची योजना कंपनीने आखली आहे. यातील पहिली झोतभट्टी जूनअखेरीस आणि दुसरी सप्टेंबरमध्ये बंद करण्याचे नियोजन आहे. यामुळे २ हजार ८०० कामगारांची कपात होण्याची शक्यता आहे. याला युनाईट युनियन कामगार संघटनेने विरोध केला आहे. कंपनीच्या निर्णयाविरुद्ध संघटनेने ८ जुलैपासून संप पुकारला आहे. ब्रिटनमधील पोलाद क्षेत्रातील कामगारांचा हा ४० वर्षांतील पहिला संप ठरण्याची शक्यता आहे. यामुळे प्रकल्प बंद पडण्याची भीती निर्माण झाली आहे.
हेही वाचा >>> Gold-Silver Price: अर्थसंकल्पाच्या दिवशी सोन्याच्या दरात बदल; मुंबईतील १० ग्रॅमची किंमत आता…
याबाबत टाटा स्टीलचा प्रवक्ता म्हणाला की, पुढील काही दिवसांत आम्ही सुरक्षितपणे प्रकल्पातून काम सुरू ठेवू शकू की नाही, याबद्दल साशंकता आहे. कारण कामगारांनी संपाचा इशारा दिला आहे. त्यामुळे आम्हाला पोर्ट टॅब्लॉट प्रकल्पातील अवजड कामकाज स्थगित करावे लागेल अथवा थांबवावे लागेल.
वादाची पार्श्वभूमी काय?
टाटा स्टीलने ब्रिटनमधील पोलाद व्यवसाय तोट्यातून बाहेर काढण्यासाठी पोर्ट टॅब्लॉट प्रकल्पातील दोन झोतभट्ट्या बंद करण्याची घोषणा जानेवारीमध्ये केली. या झोतभट्ट्यांऐवजी कार्बन इलेक्ट्रिक आर्क झोतभट्ट्यांचा वापर केला जाणार आहे. याला ब्रिटन सरकारकडून ५० कोटी पौंडाचे अर्थसाहाय्य मिळणार आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात कामगारांच्या नोकऱ्यांवर गदा येणार असल्याने त्यांनी संपाचा इशारा दिला आहे.