मुंबई : भांडवली बाजारात गुरुवारच्या सत्रात टाटा समूहातील ‘रत्नां’पैकी एक असलेल्या टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेडसह गांधार ऑइल रिफायनरी इंडिया, फ्लेयर रायटिंग इंडस्ट्रीज आणि फेडबँक फायनान्शियल अशा चार नवीन समभागांचे पदार्पण होणार आहे. टाटा समूहातील सध्या ध्वजाधारी असलेली कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचा समभाग २००४ मध्ये बाजारातील सूचिबद्धतेनंतर तब्बल १८ वर्षांनंतर टाटा समूहातील कंपनी बाजारात सूचिबद्ध होत असल्याने सर्वांचे तिच्याकडे लक्ष लागले आहे. ‘टाटा’ हे नाव जोडले गेल्यामुळे तिचे बाजार पदार्पण कसे होते याबाबत उत्सुकता आहे.
विश्लेषकांच्या मते, समभाग ७५ ते ८० टक्के अधिमूल्यासह म्हणजेच ८८९ ते ८९९ रुपयांच्या पातळीवर सूचिबद्ध होण्याची शक्यता आहे. ‘टाटा टेक्नॉलॉजीज’ची भागविक्री गेल्या आठवड्यात, प्रत्येकी ४७५ ते ५०० रुपये किमतीला २४ नोव्हेंबरपर्यंत सुरू होती. गुंतवणूकदारांकडून जवळपास ६९.४३ पट अधिक भरणा करणारा प्रतिसाद तिने मिळविला. म्हणजे अर्थातच ‘आयपीओ’साठी अर्ज केलेल्यांपैकी थोड्याच गुंतवणूकदारांना प्रत्यक्षात समभाग प्राप्त झाले आहेत.
टाटा मोटर्स उच्चांकी पातळीवर
टाटा टेक्नॉलॉजीजमधील बहुतांश हिस्सा पालक कंपनी टाटा मोटर्सकडे आहे. मुळातच टाटा टेक्नॉलॉजीजचा आयपीओ शेअर बाजारात आणण्याचे मुख्य कारण म्हणजे भांडवली बाजारातील समभाग सूचिबद्धतेचा फायदा पदरी पाडून घेणे, तसेच विद्यमान भागधारकांकडील समभागांची बाजारात विक्री करणे असा आहे. परिणामी मंगळवारच्या सत्रात सुमारे १२ वर्षांनंतर टाटा मोटर्सच्या समभागाने ७०० रुपयांची पातळी ओलांडली. दिवसअखेर तो २.१३ टक्क्यांच्या वाढीसह ७१२.३५ रुपयांवर स्थिरावला. त्याने सत्रात ७१४.४० रुपयांची ऐतिहासिक पातळी गाठली.
गांधार ऑइल रिफायनरी इंडिया, फ्लेअर रायटिंग इंडस्ट्रीज आणि फेडबँक फायनान्शियलच्या समभागांच्या बाजार पदार्पणाकडेदेखील गुंतवणूकदार लक्ष ठेवून आहेत. त्यापैकी टाटा टेक्नॉलॉजीजनंतर गांधार ऑइल रिफायनरी इंडियाच्या आयपीओ खरेदीसाठी सर्वाधिक अर्ज प्राप्त झाले होते. किरकोळ गुंतवणूकदारांकडून २९.९२ पट अधिक भरणा झाला होता. तसेच फ्लेअर रायटिंग इंडस्ट्रीजच्या ५९३ कोटी रुपयांच्या आयपीओसाठी किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या हिश्शामध्ये सुमारे १३.७३ पट भरणा झाला. तर फेडबँक फायनान्शियलच्या आयपीओसाठी या आयपीओंच्या तुलनेत कमी प्रतिसाद मिळाला असला तरीही दुपटीहून अधिक भरणा झाला होता.