करदात्यांसाठी विविध प्रक्रिया सुलभ करण्याच्या मालिकेत, प्राप्तिकर विभागाच्या अधिकृत ऑनलाइन संकेतस्थळावर ‘ई-पे टॅक्स’ या नवीन वैशिष्ट्याची भर केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) घातली आहे. ज्यायोगे प्राप्तिकर विभागाच्या प्रणालीत प्रवेशासाठी ‘लॉग इन’ करावे न लागताच विनाविलंब करदायीत्व पूर्ण करणे करदात्यांना शक्य बनले आहे.प्राप्तिकर विभागाने प्रस्तुत केलेले ‘ई-पे टॅक्स’ ही नवीन सुविधा म्हणजे करविषयक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी एक सुंदर, कार्यक्षम आणि त्रासमुक्त पद्धत आहे, असे सीबीडीटीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. कर-भरणा करण्यासाठी बँकांसमोर लांब रांगा, कंटाळवाणे अर्ज, चलान भरणे आणि शेवटच्या क्षणी कर भरण्याची चिंता यासारख्या कटकटी यामुळे संपुष्टात आल्या असल्याचा कर मंडळाचा दावा आहे.
नवीन ई-पे टॅक्स सुविधा लॉगइनशिवाय कार्यरत होत असल्याने, वापरकर्त्या करदात्यांना पासवर्ड लक्षात ठेवायची गरजही उरलेली नसल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे. कर भरणा ऑनलाइन पद्धतीने करण्यासाठी, करदाते अधिकृत ई-फायलिंग संकेतस्थळाला भेट देऊ शकतील आणि ‘ई-पे टॅक्स’ पर्याय निवडू शकतील. प्रमाणीकरणासाठी, करदात्यांना केवळ त्यांचा पॅन (स्थायी खाते क्रमांक) आणि मोबाईल क्रमांक प्रविष्ट करावा लागेल आणि त्यांच्या फोनवर पाठवला जाणारा ‘ओटीपी’ सत्यापित करावा लागेल. त्यानंतर…
त्यानंतर, त्यांना योग्य कर प्रकाराची निवड करावी लागेल. म्हणजेच प्राप्तिकर किंवा आगाऊ कर यापैकी एकाची निवड करून, अधिभार, व्याज किंवा दंड समाविष्ट करून संबंधित देयकाबाबतचे तपशील नोेंदवावे लागतील. माहितीची तपासणी पूर्ण केल्यानंतर, करदात्यांना व्यवहार पूर्ण करावा लागेल. करदात्यांना त्यांच्या देयकाची पावती (चलान) डाउनलोड करता येण्यासह, प्रक्रिया पूर्ण झाल्याची एसएमएस आणि ईमेलद्वारे त्वरित पुष्टीही मिळविता येईल.
हे केवळ एक तंत्रज्ञान अद्ययावतीकरण नव्हे तर डिजिटल प्रशासन कसे दिसावे याचे प्रात्यक्षिक असलेली ही एक छोटी खिडकी आहे. हे नवीन वैशिष्ट्य वेळेवर अनुपालनाच्या संस्कृतीला देखील प्रोत्साहन देईल, असे सीबीडीटीने निवेदनात म्हटले आहे.
© The Indian Express (P) Ltd