मुंबई : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) पुन्हा एकदा समभाग पुनर्खरेदी (बायबॅक) करण्याची योजना आखत आहे. कंपनीच्या संचालक मंडळाच्या ११ ऑक्टोबरच्या नियोजित बैठकीत समभाग पुनर्खरेदीचा प्रस्ताव चर्चेला घेतला जाणार आहे.
कंपनीने येत्या ११ ऑक्टोबरला, सप्टेंबरअखेर सरलेल्या दुसऱ्या तिमाहीतील आर्थिक कामगिरीची घोषणा करण्यासाठी मुंबईत संचालक मंडळाची बैठक बोलावली आहे. सध्या टीसीएसकडे जून २०२३ अखेर १५,६२२ कोटी रुपये रोकड गंगाजळी उपलब्ध आहे. कंपनीकडील रोकड गंगाजळीचा भागधारकांना लाभ मिळवून देण्याच्या धोरणानुरूप ही समभाग पुनर्खरेदी योजना आखत आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे शुक्रवारच्या व्यवहारात समभाग ०.८९ टक्क्यांनी उंचावत मुंबई शेअर बाजारात ३,६२१.२५ रुपयांवर स्थिरावला.
कंपनीच्या ताळेबंदातील अतिरिक्त रोकड ही भागधारकांना जास्तीत जास्त परत करण्याच्या दीर्घकालीन धोरणाचा भाग म्हणून टीसीएसने समभाग पुनर्खरेदीची परंपरा नेटाने निभावली आहे.
टीसीएसची समभाग पुनर्खरेदीची परंपरा कशी?
गेल्या वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये टीसीएसने १८,००० कोटींची पुनर्खरेदी योजना जाहीर करत भागधारकांच्या हाती असलेले ४ कोटी समभाग प्रति समभाग ४,५०० रुपये किमतीला खरेदी केले होते. तर वर्ष २०२० मध्ये डिसेंबर महिन्यात टीसीएसने भागधारकांच्या हाती असलेले ५.३३ कोटी समभाग प्रति समभाग ३,००० रुपये किमतीला खरेदी केले होते. त्यानंतर पुन्हा २०१८ मध्ये टीसीएसने १६,००० कोटी रुपये खर्चाची समभाग पुनर्खरेदीची त्या समयी विक्रमी मानली गेलेली योजना जाहीर केली. प्रति समभाग २,१०० रुपये किमतीला भागधारकांकडील समभाग त्यासमयी खरेदी करण्यात आले होते. त्याआधी २०१७ सालात, प्रति समभाग २,८५० रुपये किमतीला टीसीएसने भागधारकांकडून समभाग खरेदी केली आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला, इतर दोन मोठ्या माहिती तंत्रज्ञान (आयटी) कंपन्यांनी समभाग पुनर्खरेदीची योजना राबविली होती. फेब्रुवारी २०२३ मध्ये, इन्फोसिसने ९,३०० कोटी रुपयांचे ६.०४ कोटी समभाग खरेदी केले. तर जूनमध्ये, विप्रोने १२,००० कोटी रुपयांचे समभाग पुनर्खरेदी केली, जी आतापर्यंतची सर्वात मोठी समभाग पुनर्खरेदी योजना होती.