गेल्या काही दिवसांपूर्वीच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये मोठा कथित घोटाळा झाल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं होतं. त्यावरच आता टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने त्यांच्या भरती प्रक्रियेतील फसवणुकीच्या आरोपांचे खंडन केले आहे. “आम्ही तक्रारीत केलेल्या आरोपांची चौकशी केली असता आरोपांमध्ये तथ्य नसून कंपनीकडून कोणतीही फसवणूक झालेली नाही. कथित घोटाळ्याचा संदर्भ चुकीचा आहे,” असं TCS ने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
कंपनीतील भरती उपक्रम फक्त रिसोर्स मॅनेजमेंट ग्रुप (RMG) द्वारे हाताळले जात नाहीत, त्यामुळे भरती प्रक्रियेतील कथित घोटाळ्याचा संदर्भ चुकीचा आहे. आरएमजी विभागाला विविध प्रकल्पांना संसाधने वाटप करणे आणि कंत्राटदारांमार्फत कर्मचारी भरण्याचे काम सोपवले आहे. त्यात आमच्या प्रमुख व्यवस्थापकीय पदांवरील कोणत्याही बड्या अधिकाऱ्यांचा अनियमिततेशी संबंध आढळलेला नाही. हा मुद्दा विशिष्ट कर्मचारी आणि कंत्राटदार कर्मचारी पुरवणार्या कंपन्यांकडून आचारसंहितेच्या उल्लंघनाशी संबंधित आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचाः २००० च्या नोटेनंतर आता ५०० रुपयांच्या नोटेबाबत मोठी माहिती; काय आहे व्हायरल दाव्यामागचं सत्य?
एका व्हिसलब्लोअरने केला खुलासा
लाइव्ह मिंटच्या एका बातमीनुसार, सर्वात मोठ्या आयटी कंपनीत नोकरी मिळवून देण्याच्या बदल्यात काही बड्या अधिकाऱ्यांनी कन्सल्टन्सी स्टाफिंग फर्मकडून मोठं कमिशन घेतले. हा संपूर्ण भाग एका व्हिसलब्लोअरने उघड केला आहे, ज्याने या प्रकरणाची माहिती TCS चे मुख्य कार्यकारी अधिकारी के कृतिवासन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीओओ) एन गणपती सुब्रमण्यम यांना दिली. टीसीएसच्या रिसोर्स मॅनेजमेंट ग्रुपचे (आरएमजी) जागतिक प्रमुख ईएस चक्रवर्ती अनेक वर्षांपासून कर्मचारी कंपन्यांकडून त्यांना कंपनीत नोकरी मिळवून देण्याच्या बदल्यात कमिशन घेत असल्याचा आरोप व्हिसलब्लोअरने केला आहे.
कंपनीने आतापर्यंत केली ही कारवाई
तक्रार प्राप्त झाल्यानंतर TCS ने त्याची चौकशी करण्यासाठी तीन उच्च अधिकाऱ्यांची एक समिती स्थापन केली, ज्यामध्ये मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी अजित मेनन यांचाही समावेश होता. आठवड्याच्या तपासानंतर टीसीएसने चक्रवर्ती यांना रजेवर पाठवले आणि रिसोर्स मॅनेजमेंट ग्रुपच्या चार अधिकाऱ्यांना निलंबित केले. याशिवाय आयटी कंपनीने कर्मचारी भरती करणाऱ्या तीन कंपन्यांनाही काळ्या यादीत टाकले आहे.