मुंबई: टाटा समूहातील आघाडीची कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (टीसीएस) सप्टेंबरअखेर संपलेल्या तिमाहीतील आर्थिक कामगिरी, पूर्वनियोजनाप्रमाणे गुरुवारी जाहीर केली. कंपनीने गेल्या वर्षीच्या तुलनेत या तिमाहीत ४.९९ टक्के वाढीसह ११,९०९ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदविला आहे.
टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांच्या बुधवारी रात्री झालेल्या निधनामुळे तिमाही कामगिरीच्या घोषणेसाठी गुरुवारी संध्याकाळी नियोजित पत्रकार परिषद कंपनीने रद्द केली. मात्र मूळ नियोजनाप्रमाणे संचालक मंडळाची बैठक पार पडली आणि त्यानंतर जुलै-सप्टेंबर तिमाहीतील कामगिरीचे विवरण कंपनीने भांडवली बाजाराला नियमानुसार सादर करण्यात आले.
हेही वाचा : बँकिंग समभागांतील तेजीने निर्देशांकांना बळ
माहिती-तंत्रज्ञान सेवेतील देशातील सर्वात मोठ्या कंपनीने गेल्या वर्षी सप्टेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत ११,३४२ कोटी रुपयांना निव्वळ नफा कमावला होता, तर यंदा जूनअखेर संपलेल्या तिमाहीत १२,०४० कोटी रुपयांचा करोत्तर निव्वळ नफा मिळविला होता. टीसीएसचा महसूल ७.०६ टक्क्यांनी वाढून ६४,९८८ कोटी रुपयांवर पोहोचला असून, तो गेल्या वर्षी याच तिमाहीत ६०,६९८ कोटी रुपये होता.
जुलै-सप्टेंबर तिमाहीत टीसीएसचा परिचालन नफा २४.१ टक्क्यांवर आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात किंचित ०.२ टक्के घसरण झाली आहे. कंपनीतील एकूण मनुष्यबळ गेल्या तिमाहीत ५,७२६ ने वाढून ६,१२,७२४ वर पोहोचले आहे. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या सहामाहीत कर्मचाऱ्यांच्या एकूण संख्येत कंपनीने ११ हजारांनी भर घातली आहे.
हेही वाचा : इक्विटी म्युच्युअल फंडातील ओघ घटला, सप्टेंबरमध्ये ३४,४१९ कोटींची भर; थीमॅटिक, लार्ज कॅप फंडांकडे ओढा
प्रति समभाग १० रुपये लाभांश
टीसीएसच्या संचालक मंडळाची बैठक गुरुवारी झाली. या बैठकीत १ रुपये दर्शनी मूल्याच्या प्रत्येक समभागासाठी १० रुपये लाभांश जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला. कंपनीने जाहीर केलेला हा दुसरा अंतरिम लाभांश आहे.