मुंबई: माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसची (टीसीएस) १७,००० कोटींची समभाग पुनर्खरेदी (शेअर बायबॅक) येत्या १ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. गुंतवणूकदारांना ७ डिसेंबरपर्यंत समभाग पुनर्खरेदी योजनेत सहभागी होता येईल.
कंपनीने प्रत्येकी १ रुपया दर्शनी किंमत असलेल्या ४.०९ कोटी समभागांच्या म्हणजेच सुमारे १७,००० कोटी रुपयांपर्यंत समभाग पुनर्खरेदीचा प्रस्ताव दिला आहे. प्रत्येकी ४,१५० रुपये किमतीला प्रस्तावित समभाग पुनर्खरेदी केली जाणार आहे. टीसीएस पुनर्खरेदीची ३,४७० रुपये या मंगळवारच्या बंद भावाच्या तुलनेत भागधारकांना २० टक्क्य़ांचे अधिमूल्य मिळवून देणारी आहे. किरकोळ गुंतवणूकदारांकडे असलेल्या प्रत्येक सहा समभागांमागे कंपनीकडून एका समभागाची पुनर्खरेदी केली जाणार आहे.
सहा वर्षात पाचव्यांदा ‘बायबॅक’
गेल्या सहा वर्षांच्या कालावधीत ‘टीसीएस’ने आणलेली ही पाचवी समभाग पुनर्खरेदी योजना आहे. कंपनीने आतापर्यंत चार समभाग पुनर्खरेदी योजनेच्या माध्यमातून भागधारकांकडून ६६,००० कोटी रुपये मूल्याचे समभाग खरेदी केले आहेत. मंगळवारच्या सत्रात टीसीएसचा समभाग १३.०५ रुपयांच्या वाढीसह ३,४७०.१५ रुपयांवर बंद झाला. सध्याच्या समभागांच्या बाजारभावानुसार कंपनीचे १२.६९ लाख कोटींचे बाजारभांडवल आहे.
‘बायबॅक’ योजनेचा लाभार्थी टाटा समूहच!
(टीसीएस) आखलेल्या समभाग पुनर्खरेदी (बायबॅक) योजनेतून सर्वाधिक लाभ तिची सर्वात मोठी भागधारक असलेल्या टाटा सन्सला होणार आहे. या बायबॅक योजनेत टाटा सन्स सहभागी होणार असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत आहे. टाटा समूहातील सर्व कंपन्यांची धुरा सांभाळणाऱ्या टाटा सन्सचा समभाग पुनर्खरेदी योजनेअंतर्गत २.९६ कोटी समभाग विकण्याचा मानस आहे, तर टाटा समूहातील दुसरी कंपनी टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनकडे टीसीएसच्या १०,१२,६३० समभागांची मालकी आहे, त्यापैकी ११,३५८ समभागांची विक्री ही कंपनी करू इच्छिते. यातून या दोन्ही कंपन्यांना एकत्रित १२,२८४ कोटी रुपयांचा लाभ होणे अपेक्षित आहे.
समभाग पुनर्खरेदी (बायबॅक) म्हणजे काय?
एखादी कंपनी तिच्या विद्यमान भागधारकांकडून एका निर्धारित किमतीला कंपनीचे समभाग खरेदी करते यालाच समभाग पुनर्खरेदी (बायबॅक) म्हणतात. कंपनीकडून बाजारभावापेक्षा अधिक किमतीने गुंतवणूकदारांकडून समभाग खरेदी केले जातात. प्रारंभिक समभाग विक्रीच्या (आयपीओ) अगदी विरुद्ध अशी ही प्रक्रिया आहे.