नवी दिल्ली : दूरसंचार विभागाकडून येत्या ६ जूनपासून ९३,००० कोटी रुपयांच्या ध्वनिलहरींचा लिलाव सुरू होत असून, यात रिलायन्स जिओ, भारती एअरटेल, व्होडाफोन आयडिया हे प्रमुख स्पर्धक सहभागी होत आहेत. कंपन्यांनी लिलावात सहभागासाठी गेल्या आठवड्यात सरकारदफ्तरी अग्रिम ठेव जमा केली. दूरसंचार विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जिओ इन्फोकॉमने ध्वनिलहरींच्या लिलावात सहभागी होण्यापूर्वी ३,००० कोटी रुपयांची अग्रिम ठेव (ईएमडी) जमा केली आहे. त्यापाठोपाठ एअरटेलने १,०५० कोटी रुपये, तर कर्जजर्जर असलेल्या व्होडा-आयडियाने ३०० कोटी रुपये जमा केले आहेत. कंपन्यांकडून लिलावाआधी जमा करण्यात येणाऱ्या ठेवीच्या रकमेवरून त्यांची रणनीती आणि ध्वनिलहरी खरेदी योजना याबाबत संकेत मिळतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> स्टेट बँकेकडून ठेवींच्या व्याजदरात वाढ

सामान्यत: दूरसंचार कंपन्यांकडून अग्रिम ठेव रकमेच्या जास्तीत जास्त ८ ते १० पट बोली लावली जाते. मागील ध्वनिलहरींच्या लिलावात दूरसंचार विभागाला २१,८०० कोटी रुपयांची अग्रिम ठेव प्राप्त झाली होती. तसेच जुलै २०२२ मध्ये पार पडलेल्या पहिल्या ५ जी ध्वनिलहरींच्या लिलावात, सरकारने १.५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल मिळवला होता.

हेही वाचा >>> Stock Market Updates : अखेरच्या तासातील खरेदीच्या जोरावर; ‘सेन्सेक्स’ची ६७६ अंशांची कमाई

नूतनीकरणासाठी कोणतेही परवाने आले नसतानाही जिओने जास्तीत जास्त रक्कम जमा केली आहे, तर एअरटेल आणि व्होडा-आयडिया यांना ६ जून रोजी होणाऱ्या लिलावात ठरावीक मंडळांमध्ये ध्वनिलहरींचे नूतनीकरण करणे आवश्यक आहे. आगामी लिलावामध्ये, सुनील मित्तल यांच्या नेतृत्वाखालील एअरटेलला जम्मू आणि काश्मीर, ओडिशा, बिहार, उत्तरप्रदेश (पूर्व), पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये हवाई लहरींचे नूतनीकरण करणे आवश्यक आहे. व्होडाफोन आयडियाला पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश पश्चिम मंडळांमध्ये ध्वनिलहरींचे नूतनीकरण करणे आवश्यक आहे. यशस्वी बोलीदारांना २० वर्षांसाठी परवाने प्रदान केले जातील. दूरसंचार विभागाच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत जिओची एकूण संपत्ती २.३१ लाख कोटी रुपये होती. ६ मे २०२४ पर्यंत, एअरटेलची एकूण संपत्ती ८६,२६० कोटी रुपये होती, तर ३ मे २०२४ पर्यंत व्होडा-आयडियाची एकूण संपत्ती उणे १.१७ लाख रुपये होती.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Telecom companies deposit rs 4350 crore for upcoming 5g spectrum auctions print eco news zws
Show comments