Elon Musk : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा अमेरिकेची सूत्र हाती घेतल्यापासून जगभरात ट्रम्प यांच्या प्रशासनाची चर्चा सुरु आहे. कारण टॅरिफ संदर्भात घेत असलेले निर्णय आणि त्या निर्णयाचा अनेक देशांवर होणारा परिणाम यावरून ट्रम्प यांच्या प्रशासनावर टीका होत आहे. यातच सर्वात महत्वाचं म्हणजे ट्रम्प सरकारमध्ये जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले आणि टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क हे देखील सहभागी आहेत. ट्रम्प यांच्या प्रशासनात एलॉन मस्क ‘डिपार्टमेंट ऑफ गव्हर्न्मेंट इफिशियन्सी’चे (डॉज) एफिशियन्सीचं नेतृत्व करत आहेत.

काही दिवसांपूर्वी अमेरिकेत नागरिकांनी डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क यांच्या विरोधात मोठं आंदोलन केलं होतं. ट्रम्प प्रशासनाने सरकारी नोकऱ्यांमध्ये केलेल्या कपातीचा निर्णय, देशाची अर्थव्यवस्था, मानवाधिकार आणि टॅरिफ धोरण अशा मुद्द्यांवरून अमेरिकन नागरिक आक्रमक झाले होते. सरकारी खर्च कमी करण्यासाठी मस्क यांच्या विभागाने घेतलेल्या निर्णयामुळे जवळपास २० हजार लोकांना नोकऱ्यांमधून काढून टाकलं होतं, तर शेकडो जणांनी स्वेच्छेने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला होता.

या सर्व घडामोडीनंतर नागरिकांमध्ये संताप पाहायला मिळाला होता. तसेच काही नागरिकांनी उद्योगपती एलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीच्या काही इलेक्ट्रिक कार जाळत निषेध केल्याचं पाहायला मिळालं होतं. दरम्यान, यानंतर आता एलॉन मस्क यांनी ट्रम्प यांचं सरकार सोडून टेस्लाकडे लक्ष देण्याचा सल्ला वॉल स्ट्रीटवरच्या प्रसिद्ध तज्ज्ञांनी दिला आहे. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

वेडबशचे एमडी डॅन इव्हस यांनी एक्सवर (ट्विटर) म्हटलं आहे की, टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांना ट्रम्प प्रशासनातून बाहेर पडण्याची आवश्यकता आहे. तसेच इव्हस म्हणाले की वॉल स्ट्रीटचे विश्लेषक वेडबश मानतात की टेस्ला आणि एनव्हीडिया या दोन जगातील सर्वात विघटनकारी तंत्रज्ञान कंपन्यांपैकी एक आहेत. आमच्या मते एलॉन मस्क यांनी सरकार सोडावं, ‘डिपार्टमेंट ऑफ गव्हर्न्मेंट इफिशियन्सी’(डॉज) मधून एक पाऊल मागे घ्यावं आणि टेस्लाचं पूर्णवेळ सीईओ म्हणून काम पाहावं”, असं म्हटलं आहे.

दरम्यान, एलॉन मस्क हे ‘डिपार्टमेंट ऑफ गव्हर्न्मेंट इफिशियन्सी’चे (डॉज) एफिशियन्सीचं नेतृत्व करत आहेत. त्यामुळे त्यांचा ट्रम्प यांच्या प्रशासनात सहभाग वाढत असल्याने टेस्लाकडे दुर्लक्ष होत असल्याचं बोललं जातंय. यामुळे टेस्लातील गुंतवणूकदार निराश असल्याचंही म्हटलं जातं. त्यामुळे एलॉन मस्क यांनी टेस्ला किंवा ट्रम्प यांच्यापैकी एकाची निवड केली पाहिजे, असा सल्ला आता वॉल स्ट्रीटवरच्या प्रसिद्ध तज्ज्ञांनी दिला आहे.

टेस्लाचे गुंतवणूकदार रॉस गर्बर यांनी टेस्लाच्या सीईओ पदावरून एलॉन मस्क यांना हटवण्याची मागणी काही दिवसांपूर्वी केली होती. त्यांनी म्हटलं होतं की, टेस्लाच्या वाढत्या हितसंबंधांकडे एलॉन मस्क यांचं लक्ष कमी झालं आहे. त्यामुळे रॉस गर्बर यांनी टेस्लाला नवीन सीईओची आवश्यकता असल्याचं नमूद केलं होतं.