वृत्तसंस्था, नवी दिल्ली
जगातील आघाडीची मोटार उत्पादक टेस्लाचे नवीन वर्षात म्हणजेच जानेवारी २०२४ मध्ये भारतातील बाजारपेठेत आगमन होण्याची आशा आहे. लवकरच विद्युत शक्तीवरील बहुप्रतिक्षित टेस्ला भारतातील रस्त्यांवरून धावताना दिसून येईल.
सूत्रांची दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार सध्या संबंधित विभागांकडून जानेवारी २०२४ पर्यंत टेस्ला प्रवेश सुकर करण्यासाठी आवश्यक मंजूरी देण्यावर काम करत आहे. अलिकडील अहवालांनुसार, पंतप्रधान कार्यालयाने एका बैठकीचे आयोजन केले होते, ज्यामध्ये विविध विभागांमधील सरकारी उच्चपदस्थ अधिकारी टेस्लाच्या गुंतवणूक प्रस्तावासह भारतातील विद्युत वाहन (ईव्ही) उत्पादनाच्या आगामी टप्प्याचा आढावा घेत आहेत.
आणखी वाचा-एचडीएफसी बँकेचे कर्ज महागले!
चालू वर्षात जून महिन्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकेतील दौऱ्यादरम्यान टेस्लाचे प्रमुख एलॉन मस्क यांच्यात बैठक पार पडली होती. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि अवजड उद्योग मंत्रालय हे भारतातील टेस्लाच्या योजनांबद्दल सध्या चर्चा करत आहेत. सप्टेंबरमध्ये, टेस्लाने देशात बॅटरी स्टोरेज क्षमता निर्मितीसाठी कारखाना उभारण्याच्या योजनेवर काम सुरू केले आणि त्यासाठी भारत सरकारला प्रस्ताव सादर केला आहे, असा अहवाल समोर आला. देशात टेस्लासाठी पुरवठा प्रणाली तयार करण्याचे मस्क यांचे उद्दिष्ट आहे.
टेस्लाने २०२३ सालात भारतातून १.९ अब्ज डॉलरमूल्याचे वाहननिर्मितीचे सुटे भाग आयात करण्याची योजना आखली आहे. मागील वर्षी (२०२२) भारताकडून १ अब्ज डॉलर मूल्याचे घटक खरेदी केले गेले होते, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी दिली.