पीटीआय, नवी दिल्ली
देशातील प्रतिष्ठित उद्योगसमूह असलेल्या टाटा समूहातील कंपन्यांच्या एकत्रित बाजार भांडवलाने ३० लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. भारतीय भांडवल बाजारात अशी कामगिरी करणारा टाटा समूह हा पहिलाच उद्योगसमूह आहे.टाटा समूहाच्या एकत्रित बाजार भांडवलाने ६ फेब्रुवारी रोजी ३० लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला. चालू वर्षात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस), टाटा मोटर्स, टाटा पॉवर आणि इंडियन हॉटेल्सच्या समभागांमध्ये गुंतवणूकदारांनी दाखवलेल्या खरेदीच्या स्वारस्यामुळे भागधारकांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे.
टीसीएसने वर्ष २०२४ मध्ये आतापर्यंत ९ टक्क्यांहून अधिक वाढ दर्शविली आहे. टीसीएसच्या समभागाने मंगळवारच्या सत्रात ४,१४९ ही ५२ आठवड्यातील सर्वोच्च उच्चांकी पातळी गाठली. तर टाटा मोटर्स लिमिटेड २० टक्क्यांहून अधिक वधारला आहे. टाटा पॉवर १८ टक्के तर, इंडियन हॉटेल्सचा समभाग १६ टक्क्यांनी वाढला आहे. टाटा समूहातील सध्या २४ कंपन्या भांडवली बाजारात सूचिबद्ध आहेत. एकीकडे टाटा समूहातील कंपन्यांनी नवीन उच्चांकी पातळी गाठली असली तरी समूहातील तेजस नेटवर्क, टाटा एलेक्सी आणि टाटा केमिकल्स या कंपन्यांच्या समभागात या वर्षी आतापर्यंत १० टक्क्यांहून अधिक घसरण झाली. तर उर्वरित समभागांमध्ये केवळ १ ते ५ टक्क्यांची वाढ झाली आहे.
हेही वाचा >>>सिंगापूरमधील लवादाचा सोनी समूहाला दणका; विलीनीकरणाच्या अंमलबजावणीस विरोध करणारी याचिका फेटाळली
टीसीएसच्या समभागाने उच्चांकी पातळी गाठल्याने त्याचे बाजार भांडवल नवीन वर्षात ४ टक्क्यांनी वधारून १५ लाख कोटी रुपयांच्या वेशीवर पोहोचले. टीसीएस ही टाटा समूहातील सर्वात मोठी कंपनी असून सरलेल्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीने ८.१ अब्ज डॉलरची कामे मिळविणारे करार केले आहेत. शिवाय टीसीएसने अलीकडेच इंग्लंडमधील विमा क्षेत्रातील आघाडीच्या अविवासह १५ वर्षांच्या भागीदारी विस्ताराची घोषणा केली आहे.