गेल्या वर्षभरात मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि नागरी संस्थांदरम्यान झालेल्या जी २० प्रक्रिया आणि बैठकांची सांगता १८ व्या जी २० राष्ट्र प्रमुखांच्या शिखर परिषदेने होणार असून, याचे आयोजन करण्यासाठी नवी दिल्ली सज्ज झाली आहे. नवी दिल्ली शिखर परिषदेच्या समारोपाच्या वेळी जी २० नेत्यांचे घोषणापत्र स्वीकारले जाईल, ज्यात संबंधित मंत्रीस्तरीय आणि कार्यगटाच्या बैठकीदरम्यान चर्चा झालेल्या आणि सहमती झालेल्या प्राधान्यांप्रति नेत्यांची वचनबद्धता नमूद केली जाईल. नवी दिल्लीतील प्रगती मैदान येथे ९ – १० सप्टेंबर २०२३ दरम्यान जी २० शिखर परिषद होणार आहे.
जी २० डिजिटल अर्थव्यवस्था कार्यगटाच्या बैठकांचे आयोजन लखनऊ, हैदराबाद, पुणे आणि बंगळुरू येथे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने यशस्वीपणे केले. नवी दिल्लीतील १८ व्या जी २० शिखर परिषदेचे एक प्रमुख आकर्षण म्हणून डिजिटल इंडिया एक्सपीरियंस झोन उभारण्यात येत आहे. डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि भारतात मोठ्या लोकसंख्येसाठी लागू केलेल्या डिजिटल परिवर्तनाच्या यशाची जी – २० प्रतिनिधींना प्रत्यक्ष ओळख करून देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.
हेही वाचाः फ्लिपकार्ट BIG BILLION DAYS दरम्यान १ लाखांपेक्षा जास्त नोकऱ्या देणार
डिजिटल इंडिया एक्सपिरियन्स झोन आणि इंटरनॅशनल मीडिया सेंटर
देशात डिजिटल पायाभूत सुविधा लागू करण्यासंबंधी अनुभव आणि सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण सुलभ करण्यासाठी, जागतिक हितधारकांना मोठ्या आणि पुन्हा पुन्हा राबवता येतील अशा प्रकल्पांबाबत माहिती करून देण्यासाठी तसेच अभ्यागतांना तंत्रज्ञानाचे सामर्थ्य अनुभवण्याची अनोखी संधी देण्यासाठी,इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय प्रगती मैदानावरील हॉल क्र. 4 आणि हॉल क्र 14 मध्ये दोन अत्याधुनिक डिजिटल इंडिया एक्सपिरियन्स झोनची उभारणी करत आहे.
हेही वाचाः IT कंपन्या २६ नव्या शहरांमध्ये विस्तारणार; महाराष्ट्रातील २ शहरांचा समावेश
डिजिटल इंडिया ‘एक्सपिरियन्स झोन’ अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा खजिना आहे, जो डिजिटल इंडियाच्या महत्त्वपूर्ण उपक्रमांबद्दल ज्ञान आणि अंतर्दृष्टीने परिपूर्ण आहे. आधार, डिजिलॉकर, यूपीआय, ईसंजीवनी, दीक्षा, भाषिनी आणि ओएनडीसी हे सात प्रमुख उपक्रम यासाठी निवडण्यात आले आहेत. त्यांच्या माध्यमातून ‘डीपीआय’च्या अंमलबजावणीतील सर्वोत्तम पद्धती प्रदर्शित करण्यात येणार आहेत. हे प्रदर्शन अभ्यागतांना भारतातील ‘डीपीआय रिपॉझिटरीज एक्सप्लोर’ करण्यासाठी आणि जागतिक समुदायाला सुधारणांबाबत एक नवीन दृष्टी देणारा अनुभव असेल.
‘आधार फेस ऑथेंटिकेशन सॉफ्टवेअर’ चे प्रात्यक्षिक केले जाणार असून, त्याचा उपस्थितांना प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. तसेच यूपीआय विषयीच्या प्रदर्शनातून पाहुण्यांना जगभरातील यूपीआयची विविध ऍप्लिकेशन्स शोधता येतील. इतकेच नाही तर, अभ्यागत वस्तू खरेदी करण्यासाठी क्यू आर कोड स्कॅन करू शकतील. आणि नाममात्र पेमेंट देऊन ते विनाव्यत्यय व्यवहार करू शकतील.