वृत्तसंस्था, ओमाहा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेसाठी मागील काही काळ अभूतपूर्व ठरला आहे. परंतु, हा काळ आता संपत आला आहे, असा इशारा गुंतवणूकदार वॉरेन बफे यांनी दिला आहे. बफे यांनी त्यांच्या व्यवसायाबद्दलही फारसे उत्साही अंदाज वर्तवलेला नसून, चांगला काळ संपण्याचे सूतोवाच केले आहे.

जगातील सर्वात श्रीमंत गुतंवणूकदार वॉरेन बफे यांच्या बर्कशायर हाथवे या कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेकडे जगभरातील गुंतवणूकदार लक्ष ठेवून असतात. गेल्या शनिवारी (ता.६) ही सभा पार पडली. कंपनीने पहिल्या तिमाहीत कार्यान्वयन उत्पन्नात १३ टक्के वाढ नोंदवली असून, ते ८.०७ अब्ज डॉलरवर पोहोचले आहे.

आणखी वाचा-मोठी बातमी ! RBI मोदी सरकारच्या तिजोरीत टाकणार ८०,००० कोटी

या वेळी बँकिंग संकटाबाबत बफे म्हणाले की, अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेपुढे अभूतपूर्व संकटे उभी राहिली असून, २००८ नंतरच्या बँकिंग संकटाप्रमाणे अमेरिकेतील बँकांच्या समोर त्यांनी दिलेल्या कर्जाचे हप्ते थकण्याचा मोठा धोका आहे. अमेरिकेत बँक बुडण्याची ही पहिलीच वेळ नाही. भविष्यात अशी आणखी बँकिंग संकटे येऊन काही बँका दिवाळखोरीत जातील, परंतु यासाठी कोणीही काळजी करण्याची गरज नाही. त्यांचे पैसे फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशनकडे सुरक्षित आहेत. अमेरिकेच्या फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशनच्या नियमांनुसार, देशातील कोणतीही बँक बुडाली तर ग्राहकांना २.५ लाख डॉलरचा दावा मिळू शकतो.

बँकिंग क्षेत्राने ज्या प्रकारे अलीकडील संकट हाताळले त्यावरही बफे यांनी टीका केली. ते म्हणाले की, कर्जांचे हप्ते थकीत राहाण्याची भीती खरी ठरली तर आर्थिक संकट आणखी गंभीर बनून अनेक बँका दिवाळखोरीत निघून लयाला जातील. सिलिकॉन व्हॅली बँक, सिग्नेचर बँक आणि फर्स्ट रिपब्लिक बँक ज्या प्रकारे हाताळले गेले ती पद्धत पूर्णपणे चुकीची होती.

आणखी वाचा- गो फर्स्टची तिकीट विक्री बंद

ठेवीदारांवर भीतीचे सावट

अमेरिकेत ठेवीदारांवर भीतीचे सावट पसरले आहे. बँकांमध्ये आपला पैसा सुरक्षित नाही, अशी भीती ठेवीदारांच्या मनात असेल, तर अशा स्थितीत आपण अर्थव्यवस्था चालवू शकत नाही. मात्र, सर्व धक्के पचवून अमेरिकेची अर्थव्यवस्था लवकरच सावरेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवरील आपला विश्वास कमी झालेला नाही, आजच्या काळातही मला अमेरिकेत जन्म घ्यायला आवडेल, असेही त्यांनी नमूद केले.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The good times of the american economy are over print eco news mrj
Show comments