लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई: राजस्थानमधील प्रसिद्ध सांभर तलावाला लागून असलेल्या नवा सिटी येथे सुसज्ज रिफायनरीद्वारे तेथील जमिनीतील खाऱ्या पाण्याद्वारे शुद्ध मीठ तयार करणारी गोयल सॉल्ट लिमिटेडने ‘एनएसई इमर्ज’ या बाजारमंचावर सूचिबद्धतेसाठी प्रारंभिक समभाग विक्री प्रस्तावित केली आहे. प्रत्येकी ३६ ते ३८ रुपये किमतपट्ट्यासह ही समभाग विक्री २६ ते २९ सप्टेंबरदरम्यान सुरू राहील आणि त्यायोगे १८.१६ कोटी रुपये उभारले जाणे कंपनीला अपेक्षित आहे.

कंपनीकडून घरगुती खाद्य मिठासह, औद्योगिक वापराच्या मिठाचीही निर्मिती केली जाते. कंपनीचे दर्जेदार तिहेरी-रिफाइन्ड फ्री-फ्लो आयोडीनयुक्त मीठ, दुहेरी-फोर्टिफाइड मीठ आणि तिहेरी-रिफाइन्ड अर्ध-कोरडे मीठ हे उत्तर भारतातील १३ राज्यांमध्ये प्रामुख्याने विकले जाते. कंपनीचा मार्च २०२३ अखेर वार्षिक महसूल ११७.७१ कोटींचा असून, त्यामध्ये तीन वर्षांत वार्षिक सरासरी २५ टक्के दराने वाढ झाली आहे. यातील सरकारकडून आलेल्या मागणीचाही मोठा वाटा राहिला असून, चालू वर्ष हे निवडणुकीचे वर्ष असल्याने कंपनीला याच गतीने महसुली वाढ अपेक्षित असल्याचे, गोयल सॉल्टचे अध्यक्ष राजेश गोयल यांनी स्पष्ट केले. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान आणि झारखंडमध्ये सरकारने सार्वजनिक वितरण प्रणाली आणि पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत घरोघरी मोफत शिधावाटपात गोयल सॉल्टच्या मीठच वापरात आणले गेले आहे.

हेही वाचा… मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी आर्थिक नियोजन

या व्यवसायात दशकभराहून अधिक अनुभव असलेली ही कंपनी गुजरातमध्ये नवीन प्रकल्प स्थापित करीत असून, त्यायोगे देशव्यापी विस्तार आणि निर्यात बाजारातील संधींनाही हेरले जाणार आहे. पुढील वर्षी ऑक्टोबरपर्यंत कार्यान्वित होणे अपेक्षित असलेल्या नव्या प्रकल्पातून कंपनी शुद्ध मीठ उत्पादनाची क्षमता सध्याच्या प्रति दिन ७०० टनांवरून, १६०० टनांवर जाईल, असे गोयल यांनी सांगितले.

होलानी कन्सल्टंट्स प्रा. लि.द्वारे व्यवस्थापित या एसएमई भागविक्रीसाठी गुंतवणूकदारांना किमान ३,००० समभाग आणि नंतर ३,००० च्या पटीत समभागांसाठी बोली लावून अर्ज करता येईल.