पीटीआय, नवी दिल्ली
तंत्रज्ञानाधारित ऑनलाइन शिकवणी मंच असलेल्या ‘बैजू’ची पालक कंपनी थिंक अँड लर्नच्या दिवाळखोरी प्रक्रियेविरोधात कंपनीचे संस्थापक बायजू रवींद्रन यांनी राष्ट्रीय कंपनी कायदा अपिलीय न्यायाधिकरणासमोर (एनसीएलएटी) दावा दाखल केला आहे. मात्र हे प्रकरण ज्या पीठापुढे होते, त्यातून सोमवारी एका न्यायाधीशांनी माघार घेतली. त्यामुळे ही सुनावणी आता लांबणीवर पडली आहे.
न्यायाधिकरणाच्या चेन्नईस्थित खंडपीठासमोर सोमवारी या खटल्यावर सुनावणी होती. पीठाचे सदस्य (न्यायिक) न्यायाधीश शरद कुमार शर्मा आणि सदस्य (तांत्रिक) जतींद्रनाथ स्वेन यांच्यासमोर ही सुनावणी होणार होती. तथापि, सुनावणीपूर्वी न्यायाधीश शर्मा यांनी माघार घेतली. न्यायाधीश होण्याआधी एका प्रकरणांत वकील म्हणून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) बाजू त्यांनी मांडली होती, असे त्यांनी म्हटले आहे. बैजूच्या अपील दाव्यात बीसीसीआय प्रतिवादी आहे आणि न्यायाधिकरणाच्या कोणत्याही आदेशाचा फायदा त्यांना होऊ शकतो, त्यामुळे खटल्यातून माघार घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा >>>Gold-Silver Price: सोन्याच्या भावात मोठी घसरण पाहून महिला आनंदित! १० ग्रॅमचा भाव ऐकून बाजारात उसळली गर्दी
आता एनसीएलएटी न्यायाधिकरणाचे अध्यक्ष न्यायाधीश अशोक भूषण यांच्यासमोर हे प्रकरण पुन्हा जाईल. त्यानंतर ते नवीन खंडपीठाकडे हा खटला सुनावणीसाठी पाठवतील. राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाने १६ जुलैला बीसीसीआयची याचिका मंजूर करून थिंक अँड लर्नच्या दिवाळखोरीचे निर्देश दिले होते. थकीत १५८ कोटी रुपयांची परतफेड बैजूने न केल्याप्रकरणी बीसीसीआयकडून दाखल दावा मंजूर करण्यात आला आहे. या दिवाळखोरीच्या कार्यवाहीच्या आदेशाला बैजू रवींद्रन यांनी न्यायाधिकरणासमोर आव्हान दिले आहे.