वृत्तसंस्था, नवी दिल्ली
श्रीमंत भारतीय व्यवस्थापकांमध्ये अरिस्टा नेटवर्कच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जयश्री उल्लाल यांनी पहिले स्थान पटकावले आहे. त्यांनी मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला आणि अल्फाबेटचे (गूगल) मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचई यांना मागे टाकले आहे.
‘हुरून इंडिया रिच लिस्ट २०२३’ या प्रसिद्ध झालेल्या ताज्या सूचीत श्रीमंत भारतीय व्यवस्थापकांचाही समावेश आहे. त्यात अरिस्टा नेटवर्कच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जयश्री उल्लाल २० हजार ८०० कोटी रुपये व्यक्तिगत संपत्तीसह पहिल्या स्थानी आहेत. उल्लाळ यांचा जन्म लंडनमधील असून, त्या दिल्लीत वाढल्या आहेत. अरिस्टाच्या प्रमुखपदाची धुरा त्यांनी २००८ मध्ये हाती घेतली. यादीत दुसऱ्या स्थानी ओरॅकलचे अध्यक्ष थॉमस कुरियन हे १५ हजार ८०० कोटी रुपयांच्या संपत्तीसह आहेत.
जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा हे तिसऱ्या स्थानी असून, त्यांची संपत्ती ७ हजार ६०० कोटी रुपये आहे. मायक्रोसॉफ्टचे सत्या नाडेला हे चौथ्या स्थानी आहेत. त्यांची संपत्ती ७ हजार ५०० कोटी रुपये आहे. पाला अल्टो नेटवर्क्सचे प्रमुख निकेश अरोरा हे ७ हजार ४०० कोटी रुपयांच्या संपत्तीसह पाचव्या स्थानी आहेत. गूगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचई हे सहाव्या स्थानी असून, त्यांची संपत्ती ५ हजार ४०० कोटी रुपये आहे.
श्रीमंत भारतीय व्यवस्थापक
१) जयश्री उल्लाल (अरिस्टा नेटवर्क्स)
२) थॉमस कुरियन (ओरॅकल)
३) अजय बंगा (जागतिक बँक)
४) सत्या नाडेल (मायक्रोसॉफ्ट)
५) निकेश अरोरा (पालो अल्टो नेटवर्क्स)
६) सुंदर पिचई (गूगल)