तुम्हीही यूट्यूबवरून कमाई करत असाल तर आताच सावध व्हा. कारण तुमच्या कमाईचा संपूर्ण हिशेब प्राप्तिकर विभागाला देऊन कर जमा करावा लागणार आहे. तसेच YouTube वरून पैसे कमवण्यासाठी तुम्ही असा कोणताही व्हिडीओ कधीही बनवू नये, जो बेकायदेशीर श्रेणीत येतो. प्राप्तिकर विभागाने यूपीमधील एका यूट्यूबरच्या घरावर छापा टाकल्यामुळे आम्ही तुम्हाला आताच सल्ला देत सावध करीत आहोत. या यूट्यूबरने बेकायदेशीरपणे कमाई केल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, प्राप्तिकर विभागाने अद्याप कमाईचा अवैध मार्ग उघड केलेला नाही.
खरं तर हे प्रकरण उत्तर प्रदेशमधल्या बरेलीचे आहे. येथील तस्लीम नावाच्या यूट्यूबरच्या घरावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला. छाप्यात घरातून २४ लाखांची रोकड प्राप्तिकर विभागाकडून जप्त करण्यात आली आहे. तस्लीमने त्याच्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून एक कोटी रुपये कमावले आहेत. विशेष म्हणजे या YouTuber वर बेकायदेशीरपणे पैसे कमावल्याचा आरोप आहे. त्याचबरोबर तस्लीमच्या कुटुंबीयांनी या छाप्याला षडयंत्र असल्याचं सांगत यूट्यूबवरून पैसे कमवणे हा गुन्हा नसल्याचे म्हटले आहे. तसेच यूट्यूबच्या कमाईवर ४ लाख रुपयांचा करही भरला आहे.
तस्लीम शेअर बाजाराशी संबंधित व्हिडीओ बनवतो
तस्लीमचा भाऊ फिरोज सांगतो की, तस्लीमचे यूट्यूब चॅनल ‘ट्रेडिंग हब ३.०’ अशा नावाचे आहे. या चॅनेलवर त्याचा भाऊ शेअर मार्केटशी संबंधित व्हिडीओ अपलोड करतो. त्याने यूट्यूबच्या माध्यमातून १.२ कोटी रुपयांचे उत्पन्न कमावले असून, ४ लाख रुपये करही भरला आहे, असंही फिरोज दावा करतो. छापेमारी हा विचारपूर्वक केलेला कट आहे. प्राप्तिकर विभागानेही अद्याप या छाप्याबाबत फारशी माहिती दिलेली नाही.
youtube वरून कमाई करणे हे व्यवसायाचे उत्पन्न मानले जाते
मिळालेल्या माहितीनुसार, YouTube मधून मिळणारी कमाई हे व्यावसायिक उत्पन्न मानले जाते. चार्टर्ड अकाउंटंट रुचिका भगत सांगतात की, जर एकूण उत्पन्न एक कोटी रुपयांपेक्षा जास्त असेल, तर YouTube ला प्राप्तिकर कायद्याच्या कलम ४४एबी अंतर्गत कर भरावा लागतो. त्यासाठी खात्याचे ऑडिट करणे आवश्यक आहे. हे काम नोंदणीकृत चार्टर्ड अकाउंटंटकडून केले जाते.