लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबई: जागतिक पातळीवर अनिश्चितता असून देखील त्या तुलनेत अर्थव्यवस्था वेगाने सामान्यस्थितीत येण्याच्या अपेक्षेमुळे समभागांची बाजारात नोंदणी करून भांडवल उभारण्याच्या कंपन्यांच्या प्रयत्नांना प्रतिसाद लाभत आहे. परिणामी विद्यमान वर्षात प्रारंभिक समभाग विक्रीद्वारे (आयपीओ) भांडवली बाजारात प्रवेश करणाऱ्या कंपन्यांच्या जोरावर भारतीय भांडवली बाजाराने अव्वल स्थान गाठले आहे.
वर्ष २०२१ वर्ष ‘आयपीओ’साठी बहारदार ठरले होते. त्याचप्रमाणे विद्यमान वर्षात देखील २०२१ मधील पुनरावृत्ती होण्याची आशा आहे. कारण प्रारंभिक समभाग विक्रीतून चालू आर्थिक वर्षात ८०,००० कोटी रुपयांची निधी उभारणी अपेक्षित आहे.
प्राथमिक बाजारातील तेजीने प्रमुख निर्देशांकांना नव्या उच्चांकी पातळीवर पोहोचवण्यास मदत केली आहे. विद्यमान वर्षातील एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत सेन्सेक्स आणि निफ्टीने प्रत्येकी २ टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली. सेन्सेक्स आणि निफ्टीने सरलेल्या महिन्यात १५ सप्टेंबर रोजी अनुक्रमे ६७,९२७.२३ आणि २०,२२२.४५ या विक्रमी उच्चांकी पातळी गाठली. या वर्षाच्या सुरुवातीपासून ते सप्टेंबरअखेरपर्यंत सेन्सेक्स ७ टक्क्यांनी वधारला आहे. तर व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मिड आणि स्मॉलकॅप निर्देशांकांनी या कालावधीत अनुक्रमे २५ टक्के आणि २८ टक्क्यांहून तेजी अनुभवली.
हेही वाचा… व्याजदर कपात तूर्त नाहीच; रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचे स्पष्टीकरण
विद्यमान वर्षातील पहिल्या सहा महिन्यांत भांडवली बाजारात ८० नवीन कंपन्यांचे आगमन झाले, अशी माहिती जागतिक सल्लागार संस्था ‘अर्न्स्ट अँड यंग’ने संकलित केलेल्या आकडेवारीने स्पष्ट केले. जागतिक पातळीवर अनिश्चितता असूनदेखील देशांतर्गत भांडवली बाजारात प्राथमिक विक्रीला संस्थात्मक आणि किरकोळ गुंतवणूकदारांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभत असल्याचे दिसून येत आहे तर शेअर बाजारात नोंदणीकरण्यास उत्सुक असलेल्या कंपन्यांनी अनिश्चिततेच्या वेळी ताळेबंद अधिक सुदृढ करण्यासाठी बाजारात सूचिबद्ध होण्याचा मार्ग अवलंबविला आहे.
सेबीकडून ‘आयपीओ’साठी मंजुरी
- प्रोटिन इगोव्ह टेक्नॉलॉजीज
- बीबा फॅशन
- ब्लू जेट हेल्थकेअर
- इंडिया फर्स्ट लाइफ इन्शुरन्स
- अलाईड ब्लेंडर आणि डिस्टिलर
- हेमानी इंडस्ट्रीज
- टाटा प्ले
- टाटा टेक्नॉलॉजीज
सेबीकडून मंजुरीच्या प्रतीक्षेत
- जना स्मॉल फायनान्स बँक
- डोम्स इंडस्ट्रीज
- हॅपी फोर्जिंग्ज
- मुथूट मायक्रोफिन
- सेलो वर्ल्ड इंडिया शेल्टर फायनान्स कॉर्पोरेशन
- गो डिजिट जनरल इन्शुरन्स
- नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी
- ओयो