वृत्तसंस्था, नवी दिल्ली
भारताच्या अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर चालू आर्थिक वर्षात ६.३ टक्के राहील, असा सुधारित अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) मंगळवारी वर्तविला. याआधी वर्तविलेल्या ६.१ टक्के विकास दराच्या अंदाजात आता वाढ करण्यात आली आहे. याचवेळी किरकोळ महागाईचा दर ५.५ टक्के राहण्याची शक्यताही तिने वर्तवली आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जागतिक आर्थिक स्थितीचा अहवाल मंगळवारी जाहीर केला. या अहवालानुसार, भारताचा विकासदर चालू आर्थिक वर्ष आणि पुढील आर्थिक वर्षात ६.३ टक्के राहील. चालू आर्थिक वर्षासाठीच्या आधीच्या अंदाजात ०.२ टक्के वाढ करण्यात आली आहे. एप्रिल ते जून या तिमाहीत क्रयशक्ती वाढल्याने अंदाजात वाढ करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षात किरकोळ महागाईचा दर ५.४ टक्के आणि विकास दर ६.५ टक्के राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे. भारताच्या मध्यवर्ती बँकेकडून महागाई दर नियंत्रणात ठेवण्याचे उद्दिष्ट मध्यम कालावधीत गाठले जाईल. देशाची चालू खात्यावरील तूट चालू आर्थिक वर्ष आणि पुढील आर्थिक वर्षात सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) १.८ टक्के राहील, असेही नाणेनिधीने नमूद केले आहे.
हेही वाचा… अवकाश क्षेत्र ‘एफडीआय’साठी खुले करणार! केंद्रीय उद्योग प्रोत्साहन व अंतर्गत व्यापार सचिवांचे सूतोवाच
चीनचा विकास दर कमी राहणार
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने चीनच्या विकासदराचा अंदाज घटवला आहे. याचबरोबर युरोपमधील देशांचा विकासदरही कमी राहील, असे म्हटले आहे. जागतिक पातळीवर आर्थिक वाढ कमी आणि असमान राहील. जागतिक जीडीपी यंदा ३ टक्क्यांवर कायम राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
जागतिक अर्थव्यवस्था करोना संकटातून सावरली आहे. याचबरोबर रशियाने युक्रेनवर केलेले आक्रमण आणि मागील वर्षातील ऊर्जा संकट यातूनही जग बाहेर पडत आहे. मात्र, जागतिक पातळीवर असमान आर्थिक विकास दिसून येईल. मध्यम कालावधीत साधारण विकास दराचा अंदाज आहे. – पिएरे-ऑलिव्हर गुरिंचास, मुख्य अर्थतज्ज्ञ, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी